बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा ‘हा’ माजी आमदार बंडाच्या तयारीत ?

बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा ‘हा’ माजी आमदार बंडाच्या तयारीत ?

बीड – आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीकडून तिकीट मिळणार नसल्याचा अंदाज घेत बीड जिल्ह्यातील केज मतदारसंघातील राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार पृथ्वीराज साठे हे बंड करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. या मतदारसंघातून नमिता मुंदडा यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. त्यामुळे पक्षाचा अंदाज घेऊन पृथ्वीराज साठे यांनी बंड करण्याची तयारी सुरु केली असल्याचं दिसत आहे. कारण गेली काही दिवसांपासून पृथ्वीराज साठे हे जनतेशी संवाद साधत असल्याचं दिसत आहे. मतदारसंघातील राजकीय आणि सामान्य मतदारांना भेटून ते जनतेचा कौल जाणून घेत आहेत.

दरम्यान 2012 ते 2014 या कालावधीत पृथ्वीराज साठे हे केज मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार होते. या काळात आपण जनतेसाठी काय केले?, कोणत्या योजना राबवल्या? याचा लेखाजोखा ते मतदारसंघातील गावागावात जाऊन जनेतेसमोर मांडत आहेत. त्यामुळे एकूणच साठे यांच्या या हालचालींमुळे ते बंड करणार हे निश्चित मानलं जात आहे. परंतु ते कोणत्या पक्षात जाणार हे मात्र अजुन अस्पष्ट आहे.

साठे यांच्यापुढे भाजप आणि वंचित बहूजन आघाडी हे दोन पर्याय आहेत. त्यामुळे ते भाजप किंवा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करु शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे. विधानसभा निवडणूक जवळ येत असल्यामुळे हे चित्र लवकरच स्पष्ट होणार असून साठे यांनी बंड केलं तर आगामी विधानसभा निवडणूक केज मतदारसंघात चुरशीची होणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS