राज्यात केश शिल्प मंडळाची स्थापना, नाभिक महामंडळाच्या मागणीची सरकारने घेतली दखल !

राज्यात केश शिल्प मंडळाची स्थापना, नाभिक महामंडळाच्या मागणीची सरकारने घेतली दखल !

बीड – नाभिक समाजातील होतकरू, गरीब बांधवाना त्वरित कर्ज मिळावे, कर्जाच्या माध्यमातून सलून व्यावसायिकांना उद्योग उभारता यावा, अत्याधुनिक तंत्रज्ञानद्वारे प्रशिक्षण मिळावे या हेतूने राज्यात केश शिल्प मंडळ सुरू करावे. या माध्यमातून सलून व्यावसायिकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होईल, अशी मागणी वेळोवेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळाने राज्य शासनाकडे केली होती. अखेर या मागणीला यश मिळाले असून राज्यात केश शिल्प मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या मंडळाच्या अध्यक्षपदी सुधीर उर्फ बंडू राऊत यांची वर्णी लावण्यात आली आहे. यासंदर्भातील अध्यादेश नुकताच राज्य शासनाने काढला आहे.

नाभिक समाज बांधवांसाठी हरियाणा, राजस्थान, छत्तीसगड आदी राज्यात केश शिल्प मंडळ सुरू करण्यात आले. सलून व्यवसायासाठी इतर बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करतात. या मंडळाकडून सलून व्यावसायिकांना कमी व्याजदरात कर्ज पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे केश शिल्प महामंडळातून कर्ज घेऊन समाजातील तरुण उद्योग सुरू करू शकतील, हे मंडळ सुरू केल्यास सलून व्यावसायिकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होईल. याच हेतूने महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे भगवानराव बिडवे, शशिकांत चव्हाण, प्रभाकरराव फुलबांधे, दत्ता अनारसे , सुधीर उर्फ बंडू राऊत, श्याम आस्करकर, अंबादास पाटील, दिलीप अनर्थे, रामदास पवार, सयाजी झंझार, माधव चन्ने, राजेन्द्र इंगळे, गणपतराव चौधरी , विष्णु विझणकर , राजेंद्र फुलबांधे, धरम अतकरे, विष्णु वखरे, सुनिल पोपळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी ही मागणी शासन दरबारी सातत्याने लावून धरली. यासंदर्भात अनेक निवेदने देण्यात आली. मोर्चा, धरणे, उपोषण तथा राजकिय माध्यमातून यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आला. अखेर या लढ्यास यश मिळाले असून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात केश शिल्प मंडळाची स्थापना करण्यास मान्यता दिली आहे. या मंडळाच्या अध्यक्षपदी नागपूर येथील सुधीर उर्फ बंडू राऊत यांची नियुक्ती केली आहे. या निर्णयानंतर राष्ट्रीय नाभिक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष भगवानराव बिडवे, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे राज्य उपाध्यक्ष दिलीप अनर्थे, राज्य संघटक सुनील पोपळे, मराठवाडा विभागीय अध्यक्ष विष्णू वखरे यांनी शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

समाजहितासाठी निर्णय घेणार

गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र नाभिक महामंडळाने या मागणीसाठी लढा दिला. या प्रयत्नास अखेर यश मिळाले आहे. राज्यात मोठ्या प्रमाणावर नाभिक समाज बांधव सलुन व्यवसायावर आपले कुटुंबाचे पालन पोषण करत आहे. त्यांना अत्याधुनिक पद्धतीचे प्रशिक्षण, आर्थिक साह्य तसेच समस्यांचे निराकरण केश शिल्प मंडळाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. समाजहित डोळ्यासमोर ठेऊन शासनाच्या ध्येय, धोरणानुसार अंमलबजावणी करण्यात येईल असं महाराष्ट्र केश शिल्प मंडळाचे अध्यक्ष सुधीर उर्फ बंडू राऊत यांनी म्हटलं आहे.

COMMENTS