बीड –गेवराईत राष्ट्रवादीचा तर केजमध्ये भाजपचा झेंडा !

बीड –गेवराईत राष्ट्रवादीचा तर केजमध्ये भाजपचा झेंडा !

बीड – जिल्ह्यातील केज आणि गेवराई तालुक्यातील ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले आहेत. या अंतिम आकडेवारीवरुन केजमध्ये भाजपचा झेंडा तर गेवराईत राष्ट्रवादीचा झेंडा फडकला असल्याचं दिसून आलं आहे. गेवराई तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये घेण्यात आलेल्या निवडणुका अत्यंत चुरशीच्या पहायला मिळाल्या आहेत. तालुक्यातील राष्ट्रवादीला 15 ग्रामपंचायती मिळाल्या आहेत तर शिवसेनेला 10 आणि भाजपला 7 ग्रामपंचायतींवर समाधान मानावं लागलं आहे. या निवडणुकीत भाजपचे विद्यमान आमदार लक्ष्मण पवार यांना मोठा दणका बसला  आहे. तर राष्ट्रवादीचे  विधान परिषद आमदार अमरसिंह पंडित आणि शिवसेनेचे माजी मंत्री बदामराव पंडित यांच्यामध्ये खरी लढत पहायला मिळाली. तर केज तालुक्यात भाजपची आघाडी पहायला मिळाली असून 23 पैकी 14 ग्रामपंचायतींवर भाजपला यश आलं आहे. तसेच तालुक्यातील 8 ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात आल्या आहेत तर अपक्षाला एका ग्रामपंचायतीवर विजय मिळवता आला आहे.

दरम्यान गेवराई तालुक्यातील शिवसेनेकडे बोरगावथडी, पाडळसिंगी, रोहितळ, भेंड बु., राहेरी, ढालेगाव, हिंगणगाव, पांढरी, कानडी पिंपळगाव, औरंगपुर या अकरा ग्रामपंचायती आल्या असून राष्ट्रवादीकडे शेकटा, उक्कडपिंपरी, तांदळा, काठोडा, भेंडटाकळी, सिंदफना चिंचोली, नंदपुर, कांबी, तळवट बोरगाव, बेलगाव, करचिंचोली, रसुलाबाद, गोळेगाव या ग्रामपंचायती आल्या आहेत, तर भाजपच्या ताब्यात सेलू, गायबीनगर तांडा, अगरनांदुर, वाहेगाव, संगमजळगाव, रेवकी, गोपन पिंपळगाव या ग्रामपंचायती आल्या आहेत.

तर केजमध्ये राष्ट्रवादीच्या ताब्यात काळेगावघाट, कोल्हेवाडी, लिंबाचीवाडी, माळेगाव, नायगाव, युसूफवडगाव या सात ग्रामपंचायती आल्या असून बनकरंजा, आडस, केकाणवाडी, उंबरी ग्रामपंचायतींसह 14 ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकला आहे.

ग्रामपंचायतींमध्ये पार पडलेल्या निवडणुकांकडे  पुढील  विधानसभा निवडणुकीची तयारी म्हणून बघीतलं जात आहे. दीड वर्षावर विधानसभा निवडणूक येऊन ठेपली असल्यामुळे सर्वच पक्षांकडून आतापासूनच या निवडणुकीची जोरदार तयारी सुरु आहे. त्यामुळे गेवराईमध्ये  राष्ट्रवादी आणि शिवसेनेची सरशी दिसत असून भाजपचे विद्यमान आमदार लक्ष्मण पवार यांच्यापुढे मोठं आव्हान येऊन ठेपलं आहे तर केज तालुक्यातील विद्यमान आमदार संगीता ठोंबरे यांचं वर्चस्व दिसत असलं तरी राष्ट्रवादीचं मोठं आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.

COMMENTS