मनापासून आघाडी झाली तर बीड-लातूर-उस्मानाबादमधून विजय निश्चित, पण… !

मनापासून आघाडी झाली तर बीड-लातूर-उस्मानाबादमधून विजय निश्चित, पण… !

उस्मानाबाद – बीड-लातूर-उस्मानाबाद या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक येत्या 21 मे रोजी होणार आहे. या जागेवर आतापर्य़ंत काँग्रेसचा कब्जा होता. माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे बंधू दिलीपराव देशमुख या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. मात्र सध्या प्रकृतीच्या कारणामुळे दिलीपराव देशमुख हे या जागेवरुन लढण्याची शक्यता कमी आहे. या मतदारसंघात काँग्रेसच्या तुलनेने राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे. मात्र विलासराव देशमुखांच्यामुळे दिलीपराव देशमुख यांना तिकीट मिळाले आणि विलासरावांचे मुंडे परिवाराशी जिव्हाळ्याचे संबंध असल्यामुळे दिलीपराव देशमुख यांचा सहज विजय व्हायचा. यावेळी मात्र देशमुख माघार घेणार असे दिसताच राष्ट्रवादी काँग्रेसने या जागेवर दावा केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजून कोणालाही उमेदवारी जाहीर झाली नसली तरी उद्योजक अशोक जगदाळे यांचं नाव जागेसाठी प्रामख्याने घेतलं जात आहे. जगदाळे मुळचे उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदूर्गचे आहेत. त्यांचा बांधकामाचा व्यवसाय ठाण्यात आहे. ते राष्ट्रवादीकडून इच्छुक आहेत. तसे प्रयत्नही त्यांनी सुरू केल्याचं बोललं जातंय. जगदाळे यांच्याशिवाय जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष अर्जनाताई पाटील यांचंही नाव चर्चेत आहे. अर्चना पाटील या आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आहेत. त्यांनी जोर लावल्यास तिकीट त्यांना मिळू शकते. मात्र पाटील घराणे काय भूमिका घेते यावरच राष्ट्रवादीचे तिकीट अवलंबून आहे.

भाजपकडून रमेश कराड, अशोक निलंगेकर, सुरेश धस, अभिमन्यू पवार याच्या नावाची चर्चा आहे. पंकजा मुंडे यांनी सुरेश धस यांच्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तर लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी अशोक निलंगेकर यांच्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र दोन्ही नेत्यांनी यातून माघार घेतली नाही तर रमेश कराड किंवा अभिमन्यू पवार यांच्या नावाला पसंती मिळू शकते. सध्याच्या स्थितीत सुरेश धस यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती भाजपच्या गोटातून मिळत आहे.

या मतदारसंघात एकूण 1006 मतदार आहेत. यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादीच्या मतदारांमध्ये केवळ 15 ते 20 मतांचा फरक आहे. तर काँग्रेसकडे सव्वाशेपर्यंत संख्याबळ आहे. शिवसेनेकडे 60 ते 70 मतदार आहे. दरम्यान एमआयएमसह अपक्षांचेही बळही मोठे असून 90 पर्यंत संख्याबळ आहे. याचाही मोठा परिणाम निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे. दोन्ही काँग्रेसमध्ये मनापासून आघाडी झाली आणि शिवसेनेने भाजपला पाठिंबा नाही तर आघाडीचा उमेदवार सहज बाजी मारु शकतो. मात्र आघाडी कागदावर झाली तर या अर्थपूर्ण निवडणुकीत कोणची ताकद भारी पडते त्यावरच निवडणुकीचं गणित अवलंबून आहे.

COMMENTS