“…तर जानकर साहेबांनी आपल्या बहिणीकडे बीडमध्ये एक विधानसभा किंवा लोकसभेची जागा मागावी !”

“…तर जानकर साहेबांनी आपल्या बहिणीकडे बीडमध्ये एक विधानसभा किंवा लोकसभेची जागा मागावी !”

बीड – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. त्यामुळे राज्यातील सर्वच लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण तापत असल्याचं पहावयास मिळत आहे. बीड जिल्ह्यातील बीड लोकसभा आणि बीड, परळी, गेवराई, माजलगाव, आष्टी, केज हे 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. या मतदारसंघापैकी विधानसभेच्या एका मतदारसंघात किंवा लोकसभेची जागा धनगर समाजाच्या उमेदवारासाठी सोडावी अशी मागणी धनगर सेवा संघाचे अध्यक्ष तथा केजमधील धनगर समाजाचे नेते हनुमंत शिंदे यांनी केली आहे. याबाबतची पोस्ट शिंदे यांनी आपल्या फेसबुक पेजवर केली आहे.

बीड जिल्ह्यात जर 3 लाख ते 3.25 लाख मतदार हे धनगर समाजाचे असतील तर राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि धनगरांचे नेते महादेव जानकर यांनी या सहा मतदारसंघापैकी एक विधानसभा मतदारसंघ धनगर समाजातील नेत्यासाठी सोडावा किंवा जानकर यांनी खासदारकीसाठी बीड जिल्ह्यात उमेदवारीची मागणी आपल्या बहिणीकडे करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

दरम्यान महादेव जानकर हे भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना आपली बहिण माणतात. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळीकतेचे संबंध आहेत. त्यामुळे आपल्या बहिणीकडे जानकर साहेबांनी धनगर समाजासाठी बीड जिल्ह्यात एक जागा मागावी असं हनुमंत शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे हनुमंत शिंदे यांच्या मागणीचा महादेव जानकर हे विचार करतील का ? हे पाहणं गरजेचं आहे. तसेच जानकर यांनी जर ही मागणी पंकजा मुंडे यांच्याकडे केली तर त्या भाजपकडून एक जागा धनगर समाजाच्या नेत्याला देतील का ? हे देखील पहावं लागणार आहे.

COMMENTS