बीडमधील ‘या’ गावातील ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार, निवेदन देऊनही प्रशासनाकडून दुर्लक्ष !

बीडमधील ‘या’ गावातील ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार, निवेदन देऊनही प्रशासनाकडून दुर्लक्ष !

शिरुर कासार – आष्टी, पाटोदा, शिरूर विधानसभा मतदारसंघातील नारायणवाडी या ग्रामस्थांनी वर्षानुवर्षे रखडलेल्या रस्त्यासाठी तीन महिन्यापूर्वी प्रशासनाला मतदानावर बहिष्कार टाकत असल्याचे निवेदन दिले होते यावर प्रशासनाकडून अद्याप पर्यंत कसल्याही प्रकारची उपाययोजना न झाल्याने नारायणवाडी ग्रामस्थ मतदानाच्या बहिष्कारावर मतदानाच्या दिवशीही ठाम राहिले असल्याने प्रशासनाची मोठी धावपळ होत असताना दिसत आहे.

शिरूर कासार तालुक्‍यातील नारायणवाडी हे १३५० लोकसंख्येचे गाव या गावात ७३३मतदार असून हे गाव निमगाव बंगळवाडी या ग्रुप ग्रामपंचायतीला जोडलेले आहे. नारायणवाडी ते निमगाव या रस्त्यासाठी ग्रामस्थ गेली कित्येक वर्ष शासन दरबारी उंबरठे झिजवत आहेत. परंतु शासनाने याबाबत ठोस निर्णय घेतला नसल्याने हे काम रखडले आहे. याकरिता ग्रामस्थांनी तीन महिन्यापूर्वी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना मतदानाच्या बहिष्काराचे निवेदन दिले होते यानंतर कुठलाही प्रशासकीय अधिकारी या तीन महिन्याच्या कालावधीत गावाकडे फिरकला नाही यामुळे ग्रामस्थांनी संतप्त होऊन मतदानाच्या दिवशीही मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या निर्णयावर ठाम राहिले आहेत.

नायब तहसीलदारांची मध्यस्ती

लोकशाहीच्या अधिकारापासून वंचित राहू नये यासाठी शिरूर नायब तहसीलदार किशोर सानप यांनी नारायणवाडी ग्रामस्थांची भेट घेऊन मतदान करण्याचा आग्रह केला परंतु ग्रामस्थांनी आपला निर्णय ठाम असल्याचे सांगत मतदानावर बहिष्कार कायम ठेवला आहे.

मतदान केंद्रावर शुकशुकाट.

समस्त नारायणवाडी ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला असतानादेखील प्रशासकीय पातळीवरून गावात मतदान केंद्र सुरू केले आहे परंतु ग्रामस्थांच्या बहिष्कार यानंतर या मतदान केंद्रावर मतदाराला अभावी शुकशुकाट पाहण्यासाठी मिळत असून समस्त ग्रामस्थ गावच्या एका पारावर एकवटलेले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतरच निर्णय

प्रशासकीय पातळीवर आमचा ग्रामस्थाचा विश्वास राहिला नसून सध्याच्या स्थितीत फक्त जिल्हाधिकारी साहेब यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिले तरच आम्ही ग्रामस्थ मतदानावर बहिष्कार मागे घेऊ अन्यथा आमचा बहिष्कार कायम राहील अशी भूमिका गावकय्रांनी घेतली आहे.

COMMENTS