परळी – पंकजा, डॉ. प्रितम मुंडे यांच्या कार्य तत्परतेमुळे रुग्णांच्या शस्त्रक्रियांना लगेच सुरुवात !

परळी – पंकजा, डॉ. प्रितम मुंडे यांच्या कार्य तत्परतेमुळे रुग्णांच्या शस्त्रक्रियांना लगेच सुरुवात !

परळी – राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे व डॉ. प्रितम मुंडे यांच्या कार्य तत्परतेमुळे महाआरोग्य शिबिरात निवड झालेल्या रूग्णांच्या शस्त्रक्रियांना लगेचच सुरुवात झाली आहे. उप जिल्हा रूग्णालयात आज एकाच दिवशी मोतीबिंदूच्या २४ शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाल्या, उद्या या ५ रूग्णांना चष्मे वाटप करण्यात येणार आहेत.

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान व राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या संयुक्त सहकार्याने गोपीनाथ गडावर नुकतेच महा आरोग्य शिबीर संपन्न झाले. या शिबीराचा सुमारे आठ हजार रूग्णांनी लाभ घेतला. शिबीरात ४१४ रूग्ण शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले होते, यात मोतीबिंदूच्या २१५ रूग्णांचा समावेश होता. रूग्णांना शिबीराचा ख-या अर्थाने लाभ मिळावा यासाठी पंकजा मुंडे व डॉ प्रितम मुंडे यांनी आरोग्य यंत्रणेला तत्परतेने सूचना दिल्याने शस्त्रक्रिया यांना आज उप जिल्हा रूग्णालयात सुरवात झाली.

नेत्र शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप सानप व त्यांच्या टीमने मोतीबिंदूच्या २१५ पैकी २४ रूग्णांवर आज यशस्वी शस्त्रक्रिया केल्या. आठवड्यातून दोन वेळा म्हणजे मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी टप्प्याटप्प्याने उर्वरित मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. इतर शस्त्रक्रियांच्या तारखाही संबंधित रूग्णांना कळविण्यात आल्या असून त्या सर्व शस्त्रक्रिया ५ जानेवारी पर्यंत पूर्ण होणार आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रामेश्वर लटपटे, डॉ. संभाजी मुंडे, डॉ. दिनेश कुरमे व त्यांचे सर्व सहकारी यासाठी परिश्रम घेत आहेत.

उद्या चष्मे वाटप

मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झालेल्या २४ रूग्णांना उद्या सकाळी दहा वाजता उप जिल्हा रूग्णालयात चष्मे वाटप करण्यात येणार आहेत. भाजपचे शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया तसेच शहरातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, हे शिबीर पुर्णपणे मोफत असल्याने  दुष्काळात सापडलेल्या रूग्णांना यातून मदतीचा हात मिळाला. तसेच मुंडे भगिनींनी सूचना दिल्यामुळे तातडीने शस्त्रक्रिया झाल्याबद्दल रूग्ण व त्यांच्या कुटुंबियांनी समाधान व्यक्त केले आहे.

COMMENTS