भंडारा, गोंदियात आज झेडपी अध्यक्षांची निवड, लोकसभा पोटनिवडणुकीच्या तोंडावर तरी आघाडीचं जमणार का ?

भंडारा, गोंदियात आज झेडपी अध्यक्षांची निवड, लोकसभा पोटनिवडणुकीच्या तोंडावर तरी आघाडीचं जमणार का ?

भंडारा – भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची आज निवडणूक होत आहे. दोन्ही ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले तर त्यांचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष होऊ शकतात. गेल्यावेळी भंडा-यात आघाडी झाली होती. मात्र गोंदियात होऊ शकली नाही. नाना पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यामुळे लवकरच तिथे पोटनिवडणूक होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तरी आघाडीमध्ये जमतं की पुन्हा बिघाडी होते याकडं विदर्भातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं.

अडीच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत भंडा-यात एकूण 52 जागांपैकी काँग्रेसला 19, राष्ट्रवादीला 16 तर भाजपला 13, अपक्ष 4 आणि शिवसेना 1 असे पक्षीय बलाबल होते. त्यावेळी भंडा-यात आघाडी झाली. अध्यक्षपद काँग्रेसला तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादीला मिळाले. मात्र गोंदियात राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा असूनही काँग्रेसनं भाजपसोबत घरोबा केला. त्यामुळे राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर रहावं लागलं. गोंदियातील एकूण 53 जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस 20,  भाजप 17, काँग्रेस 16 जागा मिळाल्या होत्या.

नाना पटोले यांनी भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. दोन्ही ठिकाणी काँग्रेसचाच अध्यक्ष होईल असा दावा नाना पटोले यांनी केला आहे. त्यामुळे आता आघाडी होते की बिघाडी होते याकडं विदर्भातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS