सकाळच्या सत्रात भारत बंदला मुंबईसह राज्यात चांगला प्रतिसाद, अशोक चव्हाणांसह काँग्रेस नेते पोलिसांच्या ताब्यात !

सकाळच्या सत्रात भारत बंदला मुंबईसह राज्यात चांगला प्रतिसाद, अशोक चव्हाणांसह काँग्रेस नेते पोलिसांच्या ताब्यात !

मुंबई – इंधन दरवाढीसाठी पुकारण्यात आलेल्या भारत बंदला मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळतो आहे. मुंबईत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्य नेतृत्वाखाली अंधेरी रेल्वे स्टेशनवर आंदोलन केलं. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी काही काळ रेल्वेची वाहतूक रोखून धरली. तसंच स्टेशनमध्ये सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक काही काळ थांबली होती. मात्र काँग्रेस नेत्यांची धरपकड केल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे.


त्यानंतर पोलिसांनी अशोक चव्हाण यांच्यासह माणिकराव ठाकरे, नसीम खान, संजय निरुपम यांना ताब्यात घेऊन डीए नगर पोलिस स्टेशनला नेले. दादरलाही काँग्रेस नेत्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. दादरमध्ये भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यामुळे तिथे काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी वेळीत हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. दादर स्टेशनमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी ट्रेन अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तो हाणून पाडला. गोवंडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

मुंबईत सायन परिसरात आंदोलनादरम्यान पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड केली. मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी याच भागात बसवर दगडफेक झाली. त्यामुळे बस वाहतूकही काही प्रमाणात परिणाम झाला आहे. वांद्र परिसरात काँग्रेस खासदार हुसने दलवाई यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. बेस्ट बसेसची हवा सोडून रिक्षा बंद करण्यास त्यांना दमदाटी करण्यात आली. दुकानदारांना दुकाने बंद करण्याचं आवाहन करण्यात आलं.

राज्यातही अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. जळगाव जिल्ह्यात फैजपूरमध्ये माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आल. यावेळी कार्यकर्त्यांनी रस्त्यावर टायर जाळून वाहतूक रोखून धरली. तसंच सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. नंदुरबार जिल्ह्यातही बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. नवापूर, शहादा, तळोदा,  अक्लकुवा, धडगाव तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. तर धुळे जिल्ह्यात मात्र सकाळच्या सत्रात नेते सहभागी झाले नव्हते. त्यामुळे बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.

COMMENTS