…तर भोसरी विधानसभा मतदारसंघातील राजकीय गणित बिघडणार !

…तर भोसरी विधानसभा मतदारसंघातील राजकीय गणित बिघडणार !

मुंबई – अवघ्या तीन ते चार महिन्यावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकही चांगलीच गाजणार असल्याचं दिसत आहे. पुण्यातील भोसरी मतदारसंघातही निवडणुकीची चर्चा रंगली आहे. या मतदारसंघात संभाव्य उमेदवारांमध्ये भाजपकडून आमदार महेश लांडगे, राष्ट्रवादीकडून विलास लांडे, मोहिनी लांडे, दत्ता साने, जालिंदर शिंदे अशी नावे चर्चेत आहेत. याचबरोबर आणखी एक नवीन नाव वेगाने चर्चेत आले आहे. ते म्हणजे माथाडी कामगारांची संघटना असलेल्या महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष असलेले
इरफान सय्यद होय. सय्यद हे शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय आहेत.

दरम्यान भोसरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडे उमेदवार नसल्यामुळे विधानसभेसाठी भाजप-शिवसेना युती झाल्यास भोसरी मतदारसंघात इरफान सय्यद यांना उमेेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. परंतु युती झाली नाही, तर इरफान सय्यद निवडणूक लढण्यासाठी पर्यायी पक्षाचा शोध घेऊ शकतात अशीही चर्चा आहे. त्यामुळे ते वंचित बहुजन आघाडीसोबतही जाऊ शकतात असा अंदाज आहे.

या मतदारसंघात वंचित मोठ्या संख्येने आहेत. लोकसभा निवडणुकीत वंचितच्या पाठीशी उभे राहिलेले मुस्लिम, दलित, धनगर आणि ओबीसीतील इतर समाज घटकांची संख्या मोठी आहे. या सर्वांची मोट बांधून इरफान सय्यद हे वंचिताकडून निवडणुकीच्या मैदानात उतरले, तर भोसरी मतदारसंघातील राजकीय गणित बिघडू शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सय्यद यांच्या भूमिकेकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS