छगन भुजबळांचं आज शक्तीप्रदर्शन, तीन वर्षानंतर समता परिषदेचा बीडमध्ये मेळावा !

छगन भुजबळांचं आज शक्तीप्रदर्शन, तीन वर्षानंतर समता परिषदेचा बीडमध्ये मेळावा !

बीड – महात्मा फुले समता परिषदेचा मेळावा आज बीडमध्ये होतय. संध्याकाळी चारच्या सुमारास हा मेळावा होणार आहे. या मेळाव्याची जोरदार तयारी करण्यात आली आहे. विभागीय मेळावा असला तरी जास्त जास्त लोकांनी यामध्ये सहभागी व्हावे यासाठी प्रय़त्न केले जात आहेत. तब्बल तीन वर्षानंतर समता परिषदेचा मेळावा होत आहे. गेली तीन वर्ष परिषदेची विस्कटलेली घडी पुन्हा बसवण्याचा भुजबळ यांचा प्रयत्न आहे.

महाराष्ट्र सदनातील भ्रष्टाचार आणि मनी लॉन्ड्रींग प्रकरणात भुजबळ यांना अटक झाली होती. त्यानंतर ते बराच काळ तुरुंगात होते. त्यांना लवकर जामिन मिळाला नाही. त्यामुळे भुजबळांच्या राजकीय कारकिर्दीचं काय असे प्रश्न उपस्थित केले जात होते. तसंच ते राष्ट्रवादीमध्ये राहणार की बाहेर पडणार असेही प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातील कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावत जोरदार बॅटिंग केली होती. त्यामुळे ते राष्ट्रवादीतच राहणार हे नक्की झालं आहे.

भुजबळ तुरुंगात गेल्यानंतर समता परिषदेचं काम थंडावलं होतं. त्यांचे अनेक सहकारी त्यांना सोडून दुस-या पक्षात गेले. या काळात भाजपनं सावता संघटनेच्या माध्यामातून ओबीसींचे संघटन करण्याचा प्रय़त्न केला. समता परिषदेची विस्कटलेली घडी पुन्हा बसवण्याचा भुजबळांचा प्रय़त्न आहे. त्याच्यामध्ये भुजबळ किती यशस्वी होतात ते पहावं लागेल. छगन भुजबळ, समिर भुजबळ आणि पंकज भुजबळ हे तिघेही या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत. त्यामुळे समिर भुजबळ आणि त्यांच्यात काही मतभेद आहेत या चर्चेवरही पडदा पडणार आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून या मेळाव्याकडं पाहिलं जातंय. या मेळाव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे उपस्थित राहणार आहेत. त्याशिवाय सध्या राष्ट्रवादीवर नाराज आहेत अशी चर्चा असेलेले आणि भाजपच्या वाटेवर आहेत अशी चर्चा असलेले जयदत्त क्षीरसागर हेही आजच्या मेळाव्याला हजेरी लावणार आहेत. राष्ट्रवादीतले पक्षांतर्गत कट्टर विरोधक ओबीसी मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र येत आहेत. त्याचवेळी पंकजा मुंडे यांना मात्र या कार्यक्रमाचं निमंत्रण नाही. त्यामुळे हा मेळाव्या राष्ट्रवादी पुरस्कृत असल्याची चर्चा आहे. या मेळाव्याला कसा प्रतिसाद मिळतो याकंडं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS