राज्य शासनाकडून बर्ड फ्लू नुकसानग्रस्तांना मदत जाहीर

सोलापूर : राज्यात बर्ड फ्लूचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे कुकुटपालन व्यावसायिकांना मोठे नुकसान होत असून त्यांना संकटातून बाहेर काढण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला. त्यानुसार बर्ड फ्यूमुळे मृत्यूमुखी पडलेल्या कोंबड्यांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. त्यामध्ये गावराण कोंबडीला ९० रुपये, बाॅयलर कोंबडीला ७० रुपये व दोन महिन्यापेक्षा लहान पिल्लांना २० रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार आहे, अशी माहिती पशुसंवर्धन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

राज्यात बर्ड फ्लूचा फैलाव होत आहे. बर्ड फ्लू संदर्भात अफवा व चुकीची माहिती पसरू नये यासाठी प्रशासनाने नागरिकांना योग्य व वस्तुनिष्ठ माहिती द्यावी, असे निर्देश देतानाच माणसांमध्ये या रोगाचे संक्रमण होत नसल्याने घाबरण्याचे कारण नसल्याचे पशुसंवर्धन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नमूद केले.

मंत्री भरणे म्हणाले, बर्ड फ्लू संदर्भात राज्यातील परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थान येथील समिती सभागृहात घेतला. यावेळी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे उपस्थित होते.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी बर्ड फ्लू संदर्भात आढावा घेऊन नंतर लगेचच राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना व्हीसीद्वारे बर्ड फ्लू संक्रमण आणि घ्यावयाची काळजी या संदर्भात निर्देश दिले. या रोगाचे तात्काळ निदान होण्याकरिता राज्यामध्ये पशुसंवर्धन विभागासाठी जैवसुरक्षास्तर ३ ही अद्ययावत प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. त्याची कार्यवाही तात्काळ करण्यात यावी. ज्या भागात बर्ड फ्लू रोगाची लागण नाही, अशा भागात अंडी व मांस ७० डीग्रीपेक्षा जास्त तापमानात शिजवून खाल्ल्यास काहीही धोका नसल्याचे नमूद करून याबाबत गैरसमज व अफवा पसरविण्यात येवू नयेत, असेही मंत्री भरणे यांनी आवाहन केले.

COMMENTS