2019 मध्ये भाजपची वाटचाल 2004 च्या दिशेने ?

2019 मध्ये भाजपची वाटचाल 2004 च्या दिशेने ?

काल परवा एबीबी न्यूज आणि सी व्होटर यांच्या संयुक्त विद्यमाने एक देशव्यापी पोलिटिकल सर्व्हे करण्यात आला. त्यानुसार भाजपच्या गेल्या निवडणुकीच्या तुलनेत जागा कमी होती. पण एनडीएला बहुमत मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सध्याच्या स्थितीमध्ये एनडीएला 276 जागा मिळतील तर युपीएला 112 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर इतर पक्षांना 115 जागा मिळतील असा सर्व्हेमध्ये अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

2014 मध्ये भाजपनं 282 जागा मिळवल्या होत्या. तर 2019 मध्ये हा आकडा 248 पर्यंत खाली येईल असा अंदाज सर्व्हेमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. मात्र भाजपच्या मित्रपक्षांना 28 जागा मिळतील आणि एनडीएला 276 पर्यंत मजल मारता येईल असा अंदाज आहे. तर काँग्रेसच्या जागा 44 वरुन 83 होतील असा अंदाज आहे. आणि यूपीएतील घटक पक्षांना 32 जागा मिळतील असाही अंदाज आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला 8 जागा मिळतील असा अंदाज आहे. म्हणज्येच यूपीएच्या इतर घटक पक्षांना फक्त 24 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

2004 मध्ये काय झालं होतं ?

2004 मध्ये अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. कारगिलमध्ये भारताने विजय मिळवला होता. वाजपेयींची उत्तुंग प्रतिमा, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या इटली ओरिजीनचा वाद. मुंबई – पुणे एक्सप्रेस वे यासारख्या दिसत असलेला विकासाचा मुद्दा…. फील गुड, असे एक ना अनेक मुद्दे त्यावेळच्या एनडीएच्या बाजूने होते. त्यामुळे साहजिकच पुन्हा एनडीए सत्तेवर येईल असा अंदाज व्यक्त केला जात होता. सर्वच पोलिटिक सर्व्हेही तसेच सांगत होते.

इंडिया टुडे ने फेब्रुवारी 2004 मध्ये पहिला पोलिटिकल सर्व्हे केला होता. त्यामध्ये एनडीएला 330 ते 340 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर मार्चच्या पहिल्या आठवड्यात एनडीडीव्ही, इंडियन एक्सप्रेस आणि नेल्सन यांनी संयुक्तपणे सर्व्हे केला होता. एनडीएला 287 ते 307 जागा मिळण्याचा केला होता अंदाज व्यक्त. भाजपला 190 ते 210 जागा मिळतील असा अंदाज वर्तविण्यात आला होता. प्रत्यक्षात भाजपला फक्त 138 जागांवर समाधान मानावे लागले होते.

त्याच सर्व्हेमध्ये युपीएला 143 ते 163 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. तर काँग्रेसला 95 ते 105 जागा मिळतील असा अंदाज वर्तविण्यात आला होता. प्रत्यक्षात यूपीएला 215 जागा तर काँग्रेसला 145 जागा मिळाल्या होत्या. म्हणज्येच भाजपला सर्व्हेमध्ये दाखवलेल्या जागांच्या तुलनेत तब्बल 60 ते 80 जागा कमी मिळाल्या होत्या. तर काँग्रेसला सर्व्हेमध्ये दाखवलेल्या जागांपैकी तब्बल 40 ते 50 जागा जास्त मिळाल्या होत्या.

2004 मध्येच निवडणुकीच्या अगदी तोंडावर पाच राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांनी काही संस्थांच्या मदतीने पॉलिटिकल सर्व्हे केला होता. त्या सर्वच सर्व्हेमध्ये एनडीला आघाडी दाखवण्यात आली होती. त्या पाच सर्व्हेंचा अभ्यास करुन योगेंद्र यादव यांनी त्याची सरासरी काढली होती. त्यामध्येही एनडीएला 270 ते 271 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र ते सर्व अंदाज चुकीचे ठरले आणि यूपीए डावे पक्ष आणि इतरांच्या मदतीने सत्तेवर आले. मतदारांच्या सुप्त नाराजीची अंदाज त्यावेळी कोणालाही आला नाही.

त्यावेळीही वाजपेयी विरुद्ध सोनिया गांधी अशी तुलना केली जात होती. आज मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी नेतृत्वाची तुलना केली जात आहे. मात्र नोटबंदी, जीएसटी यासारख्या मुद्यावरुन छोटा व्यावसायिक, कामगारवर्ग, व्यापारीवर्ग हे नाराज आहेत. तसंच शेतकरी वर्गही नाराज आहे. भष्ट्रचाराच्या मुद्यावरुन जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे मतदारांमध्ये नाराजीची सुप्त लाट आहे.

2014 मध्येही एनडीएला एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा मिळतील. भाजपला स्वबळावर 282 जागा मिळतील असा अंदाज एकाही सर्व्हेने दाखवलेला नव्हता. याचाच अर्थ मोदी लाटेची तीव्रता भल्याभल्यांना आली नव्हती. त्यामुळे अऩेकांचे अंदाज साफ चुकले. आता मोदी लाट निश्चितच ओसरली आहे. त्यात अनेक घटकांमध्ये सुप्त नाराजी आहे. त्याचा फटका भाजपला बसू शकतो. म्हणूनच भाजपची वाटचाल 2004 च्या दिशेनं सुरू तर नाही ना अशी शंका येते.

 

COMMENTS