आगामी निवडणुकांसाठी भाजपचा सावधानतेचा पवित्रा, अनेक नगरसेवकांचे घेतले राजीनामे !

आगामी निवडणुकांसाठी भाजपचा सावधानतेचा पवित्रा, अनेक नगरसेवकांचे घेतले राजीनामे !

नागपूर – आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपनं सावधानतेचा पवित्रा घेतला असल्याचं दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर नागपूर शहर भाजपने अचानकपणे शहरातील नगरसेवकांचे राजीनामे घेतले आहेत. आगामी निवडणुकीत नगरसेवकांनी पक्षाशी एकनिष्ठ राहावे यासाठी भाजपनं हे पाऊल उचललं असल्याचं बोललं जात आहे. माजी खासदार नाना पटोले यांच्यानंतर आमदार आशीष देशमुख यांनी उघडपणे पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. त्यामुळे विदर्भात सध्या भाजपमध्ये नाराजीचं वातावरण आहे. त्यामुळे भाजपनं आतापासूच धसका घेतला असून सावधानतेचा पवित्रा म्हणून या नगरसेवकांचे राजीनामे घेतले गेले असल्याचं बोललं जात आहे.

नागपूर महापालिकेत भाजपचे 108 नगरसेवक आहेत. यातील अनेक नगरसेवक काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेतून आलेले आहेत. या नगरसेवकांमध्ये प्रामुख्याने नाराजी असल्याचं बोललं जात आहे. यातील काही नगरसेवकांनी विकास निधी मिळत नसल्याबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. तसेच महापालिकेच्या काही निर्णयाविरोधात काही नगरसेवकांनी आवाज उठवला होता. त्यामुळे पक्षाच्या प्रतिमा खराब होत असून पक्षाला अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हे टाळण्यासाठी आता नगरसेवकांचे राजीनामे घेतल्याचे बोलले जात आहे. भाजपच्या या खेळीमुळे नगरसेवकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. यासंदर्भात भाजपचे प्रवक्ते आमदार गिरीश व्यास यांनी नगरसेवकांचे राजीनामे घेणे ही भाजपची जुनी प्रथा असून यात नवीन काहीही नसल्याचं म्हटलं आहे. तसेच हा पक्षशिस्तीचा एक भाग असल्याचही ते म्हणाले आहेत.

COMMENTS