भल्या पहाटे गिरीश महाजन अण्णांच्या दारी

भल्या पहाटे गिरीश महाजन अण्णांच्या दारी

अहमदनगर : भाजपचे नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन हे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भेटीला पोहचले आहेत. आज भल्या सकाळीच महाजन अण्णांच्या भेटीसाठी अण्णांच्या गावी म्हणजेच राळेगणसिद्धीत पोहोचले. याअगोदरही एकदा महाजन यांनी अण्णांची भेट घेतली होती.

आपल्या मागण्यांसाठी केंद्र सरकारविरोधात अण्णा हजारे यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय. गेल्या 2 महिन्यांपासून दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनामुळे केंद्र सरकारवरील दबाव वाढला आहे. अशा परिस्थीतमध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे सुध्दा आंदोलन सुरू करणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता राज्यातील भाजप नेत्यांकडून अण्णांची मनधरणी करण्याचं काम सुरु आहे. आज भल्या पहाटे माजी मंत्री गिरीश महाजन यांनी अण्णांची भेट घेतली.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री आणि भाजपनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी 22 जानेवारीला अण्णा हजारेंची भेट घेतली होती. फडवणीस यांच्यापूर्वी विखे पाटील आणि अण्णा हजारे यांच्यात तासभर चर्चा झाली. त्यानंतर फडणवीस, विखे-पाटील आणि अण्णांमध्ये पुन्हा एकदा दीड तास बंद दाराआड चर्चा झाली. यावेळी गिरीश महाजनही उपस्थित होते. या बैठकीनंतरही आपण आंदोलनावर ठाम असल्याचं अण्णा हजारे यांनी स्पष्ट केलं होतं. केंद्रीय कृषीमंत्री यांनी दिलेलं पत्र देवेंद्र फडणवीसांनी आपल्याला दिलं. त्यावर चर्चा झाली पण तोडगा निघाला नाही, असं अण्णा हजारे म्हणाले होते.

आज गिरीश महाजन आणि अण्णा हजारे यांच्यात झालेल्या बैठकीत अण्णांच्या मागण्यांबाबत दिल्ली येथे केंद्रीय कृषिमंत्री सोबत बैठक झाली असून काही निर्णय घेण्यात आले. कृषी माल भाव ठरवणारी उच्चाधिकार समिती स्थापन करणार, या निर्णयाचे पत्र गिरीश महाजन यांनी अण्णांना दिले. अण्णांनी आंदोलन करु नये अशी केली विनंती, महाजन यांनी अण्णांना केली. उद्या (शुक्रवार) केंद्रीय राज्यमंत्री अंतिम पत्र घेऊन अण्णांची भेट घेणार असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले

COMMENTS