अण्णांच्या मनधरणीसाठी भाजपचे शिष्टमंडळ

अण्णांच्या मनधरणीसाठी भाजपचे शिष्टमंडळ

अहमदनगर –  केंद्र सरकारने आणलेल्या कृषी विधेयकाच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीत जावे, त्यासाठी रविवारी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी आण्णांची भेट घेतली. यामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेताच सोमवारी भाजपच्या नेत्यांची झोप उडाली. त्यांनी तातडीने भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे, राज्यसभा खासदार डाॅ. भागवत कराड यांच्या शिष्टमंडळाने राळेगणसिद्धीत जाऊन आण्णांशी दीड तास चर्चा केली. दरम्यान, यावेळी अण्णांना कृषी कायद्याचे मराठी भाषेतील पुस्तक भेट देण्यात आले.

काल राळेगणसिद्धीमध्ये पंजाबचे शेतकरी आले होते. शेतकऱ्यांनी थाळी वाजवून अण्णा हजारे यांच्यासमोर निदर्शने केली. त्यानंतर दिल्लीत येऊन आंदोलन करण्याचे आश्वासनही अण्णांनी या आंदोलकांना दिले होते. त्यामुळेअण्णांनी दिल्लीत आंदोलन केल्यास हे आंदोलन आणखी तापून देशभरातील शेतकरी त्यात सामील होण्याची भीती असल्यानेच भाजप नेत्यांनी मनधरणी करण्यासाठी शिष्टमंडळ पाठविले.

विधानसभेचे माजी अध्यक्ष, आमदार हरिभाऊ राठोड, राज्यसभेचे खासदार डॉ. भागवत कराड, माजी जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड आणि सुनील थोरात यांनी अण्णांची भेट घेतली. सुमारे दीड तास बंद दाराआड चर्चा रंगली. मात्र, अण्णा आणि बागडे यांनी या भेटीबाबत काहीही बोलण्यास नकार दिला. त्यामुळे या दीड तासाच्या भेटीनंतर अण्णा काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

 

COMMENTS