राष्ट्रवादीचं भाजपला प्रत्युत्तर, ‘या’ महिला नेत्या करणार पक्षात प्रवेश!

राष्ट्रवादीचं भाजपला प्रत्युत्तर, ‘या’ महिला नेत्या करणार पक्षात प्रवेश!

पुणे –  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला. परंतु अशातच राष्ट्रवादीनही भाजपला फोडाफोडीच्या भाषेत प्रत्युत्तर दिलं असून भाजपच्या इंदापूर येथील नेत्या डॉ. अर्चना पाटील यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज त्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत.
बारामतीतीतील रयत भवन मार्केट यार्ड येथे आज त्यांचा जाहीर प्रवेश होणार आहे. त्यामुळे इंदापुरात राष्ट्रवादीची ताकद वाढणार असल्याचं दिसत आहे.

धनगर आरक्षणाच्या मुद्यावरुन अर्चना पाटील या भाजपवर नाराज आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांची भेट घेतली होती. धनगर समाजाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाचा शब्द दिल्यामुळे भाजप सरकार सत्तेवर आले पण, आरक्षणाचा प्रश्न भाजप सरकार गांभीर्याने घेत नाही. गेली पाच वर्षे समाजाला झुलवत ठेऊन  समाजाचा भ्रमनिरास केला आहे. तसेच शरद पवार व सुप्रिया सुळे यांनी जे धोरण अवलंबिले त्यामुळे महिला व मुलींची प्रगती झाली असल्याचं पाटील यांना म्हटलं आहे.

दरम्यान डॉ. अर्चना पाटील यांनी यापूर्वी महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव म्हणूनही काम पाहिले आहे. त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. परंतु आता पाटील या भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे आगामी काळात डॉ. अर्चना पाटील यांच्याकडे राष्ट्रवादीकडून कोणती जबाबदारी दिली जाणार याबाबतची चर्चा इंदापुरात सुरु आहे.

COMMENTS