भाजपच्या ‘या’ बंडखोर नेत्याची पक्षातून हकालपट्टी!

भाजपच्या ‘या’ बंडखोर नेत्याची पक्षातून हकालपट्टी!

मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंडखोरी करणाय्रा नेत्याची भाजपनं हकालपट्टी केली आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार दाखल करत वाकचौरे यांनी बंडखोरी केली होती. यानंतर आज पक्षशिस्त भंग केल्याचा ठपका ठेवत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

दरम्यान भाजप कोट्यातून भाऊसाहेब वाकचौरे साईबाबा संस्थानचे विश्वस्त आहे. मात्र पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याने विश्वस्त पदावर गंडांतर येण्याची शक्यता आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघात रामदास आठवले यांचा पराभव करुन शिवसेनेकडून भाऊसाहेब वाकचौरे 2009 मध्ये खासदार झाले होते.

त्यानंतर 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. 2014 च्या पराभवानंतर वाकचौरे यांनी भाजपात प्रवेश करत साई संस्थानवर विश्वस्तपद मिळवलं होतं. परंतु लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या सुचनेनुसार त्यांची हकालपट्टी करण्यात आली.

COMMENTS