लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसणार ?

लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसणार ?

नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पाच राज्यांमधील विधानसभा निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीत एक्झिट पोलनुसार भाजपला मोठा धक्का बसणार असल्याचं बोललं जात आहे. पाच पैकी तीन राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याचाच परिणाम लोकसभा निवडणुकीवरही पडणार असल्याचं बोललं जात आहे. एक्झिट पोलच्या आकडयानुसार या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला तर निश्चित लोकसभा निवडणुकीआधी भाजपासमोरील अडचणी वाढतील असं बोललं जात आहे.

दरम्यान मध्य प्रदेश, छ्त्तीसगड आणि राजस्थान या तीन राज्यांमुळे मोदींचा २०१९ मध्ये पंतप्रधानपदाचा मार्ग आणखी खडतर बनणार असल्याचं बोललं जात आहे. या तीन राज्यांमध्ये मिळून लोकसभेच्या एकूण ६५ जागा आहेत.२०१४ लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशात मोदी लाट असताना या तीन राज्यात भाजपाने एकूण ६२ जागा जिंकल्या होत्या.

मध्य प्रदेशातील लोकसभेच्या २९ पैकी २७ जागा, छत्तीसगडमध्ये ११ पैकी १० आणि राजस्थानमध्ये २५ पैकी २५ जागा भाजपाने जिंकल्या होत्या. विधानसभा निवडणुकीत या तिन्ही राज्यात काँग्रेसने मोठे मताधिक्क्य मिळवले तर लोकसभेतही हाच कल कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसणार असल्याचं बोललं जात आहे.

 

COMMENTS