लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्र्यांची पहिली सभा !

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्र्यांची पहिली सभा !

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राज्यात ठिकठिकाणी सभा घेण्यास राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी सुरुवात केली आहे. अशातच आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नोव्हेंबर-डिंसेंबरमध्ये राज्यभराचा राजकीय दौरा करणार आहेत. त्यांच्या या दौ-याची सुरुवात शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मावळ आणि शिरुर मतदारसंघातून होणार आहे. तीन नोव्हेंबर रोजी पिंपरी-चिंचवड शहरात मुख्यमंत्र्यांची पहिली सभा पार पडणार आहे.

निगडी प्राधिकरणातील मदनलाल धिंग्रा मैदानात अटल संकल्प महासंमेलन पार पडणार आहे. शनिवारी (३ नोव्हेंबर) दुपारी चार वाजता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडणार आहे. त्यामुळे याठिकाणी भाजपनं जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी केली आहे. या मेळाव्यासाठी लाखभर नागरिक जमवण्याचे भाजपचे नियोजन आहे. रावसाहेब दानवे यांनी चिंचवडला येऊन पदाधिकाऱ्याची बैठक घेतली आणि गर्दी जमवण्यासाठी सर्वाना उद्दिष्ट ठरवून दिले असल्याची माहिती आहे. मावळ आणि शिरूर मतदारसंघातील पक्षाच्या सर्व आमदारांनाही त्यांनी या कामाला लावले आहे.

 

 

दरम्यान मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचा कब्जा असून दोन्हीही मतदारसंघावर भाजपचा डोळा आहे. स्वबळावर लढण्याची वेळ आली तर त्या दृष्टीने दोन्हीही मतदारसंघातील भाजपच्या ताकदीची चाचपणी केली जाणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमात कार्यकर्त्यांच्या होणा-या गर्दीवरुन भाजपची ताकद कळणार आहे.

तसेच लोकसभा निवडणुकांच्या पूर्वतयारीसाठी मुख्यमंत्री नोव्हेंबर-डिंसेंबर दरम्यान राज्याच्या अनेक भागाचा दौरा करणार आहेत. यादरम्यान राज्यातील सर्वच लोकसभा मतदारसंघाचा आढावा आणि आपली ताकद जाणून घेण्याचा प्रयत्न भाजपच्या नेत्यांकडून केला जाणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या दौ-याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

 

COMMENTS