भाजपची महत्त्वाची बैठक, विखे पिता-पुत्रावर कारवाईची शक्यता !

भाजपची महत्त्वाची बैठक, विखे पिता-पुत्रावर कारवाईची शक्यता !

मुंबई – भाजपची आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. भाजप प्रदेश कार्यालयात ही बैठक पार पडणार असून या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, संघटन मंत्री विजय पुराणिक यांच्यासह महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत अहमदनगर जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक कामगिरीचा आढावा घेतला जाणार आहे.राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर नगरमध्ये पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. राम शिंदेंसह अनेक भाजप नेत्यांनी विखेंविरूद्ध तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे विखे पिता-पुत्रावर कारवाईची शक्यता आहे.

दरम्यान निवडणुकीपूर्वी राधाकृष्ण विखे पाटील यांचा पक्षात प्रवेश झाल्यामुळे पक्षाच्या जिल्ह्यात जागा वाढतील, असा अंदाज होता. पण माजी मंत्री राम शिंदे यांच्यासह अनेकांचा पराभव झाल्यामुळे विखे पाटलांविरोधात पक्षात नाराजी पसरली आहे. आजच्या बैठकीत आम्ही आमच्या व्यथा मांडणार असल्याचे राम शिंदे यांनी सांगितले आहे. निवडणुकीपूर्वी, निवडणुकीदरम्यान आणि निवडणुकीनंतर काय झाले हे आम्ही पक्षाला आधीच कळवले आहे. आता कारवाईची अपेक्षा असल्याचे राम शिंदे यावेळी म्हणाले. त्यामुळे आजच्या बैठकीत काय कारवाई केली जाणार हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS