भाजपने ‘या’ नेत्याची केली मंत्रीमंडळातून हकालपट्टी !

भाजपने ‘या’ नेत्याची केली मंत्रीमंडळातून हकालपट्टी !

नवी दिल्ली – भाजपच्या एका मंत्र्याची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमधील भाजप सरकारने ओमप्रकाश राजभर यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी केली असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यपाल राम नाईक यांना ओमप्रकाश राजभर यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची विनंती केली होती. मुख्यमंत्र्यांची ही विनंती राज्यपालांनी मान्य केली आहे. योगी मंत्रिमंडळात राजभर मागास वर्ग विकास आणि दिव्यांग विकास मंत्री होते.
हकालपट्टी केल्यामुळे राजभर यांना मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीचे मतदान होताच भाजप आणि सुहेलदेव भारतीय समाज पक्ष (सुभासपा)यांची युती संपुष्टात आली आहे. त्यामुळे सुभासपाचे नेते राजभर यांना मंत्रीमंडळातून काढून टाकण्यात आलं आहे.

राजभर यांनी त्यांच्या हकालपट्टीचे स्वागत करत मुख्यमंत्र्यांचा निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे याआधी राजभर यांनी स्वत:हून राजीनामा दिला होता. पण मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला नव्हता. लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपात भाजपने राजभर यांच्या पक्षाला एकही जागा दिली नव्हती. त्यामुळे नाराज झालेल्या राजभर यांनी राजीनामा दिला होता. तसेच लोकसभेसाठी उत्तर प्रदेशमधून 36 उमेदवार देखील त्यांनी उभे केले होते. त्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजभर यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली आहे.

COMMENTS