भाजप खासदाराने घेतली शरद पवारांची भेट !

भाजप खासदाराने घेतली शरद पवारांची भेट !

मुंबई – भाजप खासदारानं आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. भाजपा खासदार संजय काकडे यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी काकडे यांनी पवारांची भेट घेतली असल्याची प्राथमिक माहिती आहे. परंतु काल पाच राज्यांमधील लागलेल्या निकालानंतर संजय काकडे यांनी भाजपला घरचा आहेर दिला होता. भाजपसाठी ही तर धोक्याची घंटा असल्याचं काकडे यांनी म्हटलं होतं.

राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये पक्षाची सत्ता जाईल, असा माझा अंदाज होता. मात्र मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसने घेतलेली झेप पाहता 2019 च्या निवडणुकीत भाजपसाठी चिंताजनक परिस्थिती असल्याचं काकडे यांनी म्हटलं होतं. पक्षाने विकासाचा मुद्दा सोडून इतर बाबींवर या निवडणुकीत लक्ष दिले. त्यात राम मंदिर मुद्दा, शहरांचे नामकरण, हनुमानाची जात काढणे असे प्रकार झाले. त्याचा मतदारांवर नकारात्मक परिणाम झाला.

मी राजस्थानमध्ये निवडणुकीआधी सर्वेक्षण करण्यासाठी गेलो होतो. तेथील सरकारबद्दल नाराजी होती. हे लक्षात आले होते. मात्र मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस 25 जागांवरून शंभऱच्या पुढे जाईल, असे वाटले नव्हते. येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जाळे आहे. बूथपर्यंत भाजपची यंत्रणा आहे. चौहान सरकारबद्दल सहानुभूती होती. तरी जनतेने काँग्रेसला दिलेला पाठिंबा महत्त्वाचा असल्याचं काकडे यांनी म्हटलं होतं.

तसेच या तीन राज्यांतून 65 खासदार निवडून जातात. यापैकी 62 हे भाजपचे आणि तीन फक्त काँग्रेसचे खासदार आहेत. जातीपातीचे राजकारण केल्यामुळे 2014 चा मोदींचा विकासाचा अजेंडा मागे पडला. ही स्थिती अशीच राहिली तर 2019 साठी धोक्याची घंटा ठरेल. या परिस्थितीचा पक्षाने गंभीरतेने विचार केला पाहिज हे मी पक्षाचा खासदार म्हणून नाहीतर एक निवडणूक विश्लेषक म्हणून सांगत असल्याचंही संजय काकडे यांनी काल म्हटलं होतं. त्यानंतर आज काकडे यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

तसेच काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संपर्कात अनेक नेते असल्याचं वक्तव्य केलं होतं. तसेच हे नेते लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करतील असे संकतेही मुंडे यांनी दिले होते.

अशातच आज जे राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेले ते संपर्कात आहेत, तसेच इतरही काही नेते संपर्कात असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी दिली आहे. त्यामुळे आज भाजपचे खासदार संजय काकडे यांनी घेतलेली शरद पवारांची भेट महत्त्वाची मानली जात आहे.

COMMENTS