राज्यातील लोकसभेसाठी भाजपचा नवीन फॉर्म्युला, शिवसेनेला घेणार सोबत ?

राज्यातील लोकसभेसाठी भाजपचा नवीन फॉर्म्युला, शिवसेनेला घेणार सोबत ?

राज्यातील लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनंही जोरदार तयारी सुरु केली आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपकडून सर्व प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच शिवसेनेलाही सोबत घेणार असल्याचा दावा भाजपकडून केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या निवडणुकीमध्ये संघनिहाय तयारीऐवजी क्लस्टर फॉर्म्युला वापरण्याचा निर्णय भाजपनं घेतला असल्याची माहिती आहे. तसेच श्रेष्ठींच्या आदेशानुसार प्रदेश भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी राज्यातील ४८ मतदारसंघांचे सलग चार लोकसभा मतदार संघानुसार क्लस्टर तयार करण्यास सुरूवात केली आहे. यामध्ये क्लस्टर मतदारसंघात कोणता  संभाव्य उमेदवार किती ताकदीचा आहे या सर्व मुद्यांबाबत आराखडा तयार करुन त्यानंतरच उमेदवार जाहीर केला जाणार आहे.

दरम्यान पहिल्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्रातील मतदार संघाचा आराखडा सुरू करण्यात आल्याची माहिती आहे. तसेच आगामी लोकसभा निवडणुका शिवसेनेसोबत लढविण्याचे भाजपाचे प्रयत्न सुरू आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाजपावर नाराज असले तरी त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न भाजपाकडून सातत्याने केला जात आहे. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून शिवसेनेने कितीही टीका केली तरी उत्तर द्यायचे नाही, तसेच वरिष्ठ नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी सातत्याने संवाद साधून त्यांचा राग दूर करण्याचा प्रयत्न करायचा असे धोरण भाजपाने सुरू ठेवले आहे. सध्या दोन्ही पक्षात काही अंतर्गत कुरबुरी असल्या तरी या लोकसभा निवडणुकीत युती होईल असा दावाही भाजपचे नेते करीत आहेत. तर शिवसेना मात्र स्वबळाची तयारी करत असून राज्यातील सर्व जागांवर शिवसेनेचा उमेदवार देण्याचा मानस आहे. त्यामुळे शिवसेनेची मनधरणी करण्यासाठी भाजपला कितपत यश येणार याकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS