साद भाव-भावनांची एकमेकांच्या अंर्तमनातील गुज उकलण्याची !

साद भाव-भावनांची एकमेकांच्या अंर्तमनातील गुज उकलण्याची !

अंबाजोगाई, परमेश्वर गित्ते – बीड जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी रविवार, दि. 1 डिसेंबर रोजी सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट टाकली आणि त्यातून तमाम मुंडे सैनिकांना संदेश दिला की, आता आपण एकमेकांना भेटून अंर्तमनातील गुज उकलू आणि जी काही दरी आहे. ती दरी संवादातून संपुष्टात आणू. गेल्या अनेक दिवसांपासून तुमची इच्छा मला भेटण्याची होती परंतु मी भेटू शकले नाही. आता मीच तुम्हाला भेटू इच्छिणार आहे, बोलणार आहे, संवाद साधणार आहे आणि याशिवाय बरंच काही शेअर केलं. ती पोस्ट एवढी व्हायरल आज झालीयं की, त्या पोस्टच्या सर्व माध्यमांनी भल्या मोठ्या बातम्या केल्या. पोस्टसुद्धा तेवढीच गंभीर आणि मनाची घालमेल दर्शविणारी आहे. त्यामुळे 12 डिसेंबरला लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीदिनी पंकजाताई काय निर्णय घेतात? याकडे लक्ष लागले आहे. परंतु ज्या विचारातून व संस्कृतीतून त्या आल्या आहेत. त्याचा विचार करता भाजपा सोडतील अशी सुतराम शक्यता नाही. तरी देखील त्यांच्या निर्णयाकडे अर्थात 12 डिसेंबरकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

नुकत्याच झालेल्या परळी विधानसभा मतदारसंघातून पंकजाताई मुंडे या पराभूत झाल्या. त्यांच्या भावाकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. या पराभवाच्या पाठिशी माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव जोडले गेले. काही दाखले दिले गेले. त्यांच्या पराभवाला अनेक कारणांची किनार आहे. परंतु गेल्या महिनाभराच्या सत्तानाट्यादरम्यान त्यांची असलेली भूमिका, त्यांना मिळालेली वागणूक किंवा पक्ष म्हणून त्यांच्याविषयीची सद्भावना ही काही स्पष्ट झाली नाही.

या सर्व प्रश्नांची उकल साधारणतः 12 डिसेंबर रोजी होणार आहे. पंकजाताई मुंडे यांनी 1 डिसेंबर रोजी सोशल मीडियाद्वारे पोस्ट टाकून भावनिक संवाद साधला. या पोस्टमध्ये सर्व काही बाबी प्रामुख्याने नमूद केल्या. जशा की, निवडणुका झाल्यापासून ते पक्षांतर्गत झालेल्या सर्व घडामोडी, निवडणुका व इतर बाबींचा प्रामुख्याने समावेश आहे. परंतु या पोस्टमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की, जी डोकं खाजवायला भाग पाडते. या पोस्टमध्ये भावनिक आवाहन करतांना त्यांनी नमूद केले की, पुढं काय करायचं? कोणत्या मार्गानं जायचं? आपल्या लोकांना आपण काय देऊ शकतो? आपली शक्ती काय? लोकांची अपेक्षा काय? अशा भावनांचा उलगडा त्यात समाविष्ट करण्यात आला आहे. ही पोस्ट अत्यंत जबाबदारीने शेअर करण्यात आली आहे. त्यासोबतच आज राजकारणामध्ये झालेले बदल, जबाबदारीत झालेले बदल या सगळ्या बदलत्या संदर्भाचा विचार करून आपला सर्वांचा पुढचा प्रवास ठरवण्याची आवश्यकता आहे. अशी ही पोस्ट आहे. यामध्ये राजकीय संदर्भ दिलेला नसला तरी पक्षांतर्गत बंडाळीमधून व्यथित झालेल्या पंकजाताई मुंडे दिसत आहेत. त्यामुळे त्या वेगळा मार्ग निवडणार का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. माध्यमांनी देखील तशा बातम्या चालवल्या. सर्व वाहिन्यांवर पंकजाताईंचा विषय हाताळला जातो आहे.

मुळात पंकजाताई या ज्या विचारधारेतून आणि संस्कारातून आल्या आहेत. त्यामुळे त्या वेगळा विचार करतील याची शक्यता फार कमी आहे. कारण पंकजाताई एक खंबीर, कणखर व सक्षम नेतृत्व आहे. एका पराभवाने त्या खचतील किंवा दमतील असे नाही. आगामी काळात त्या एक निर्णायक भूमिका व येणार्‍या पाच वर्षातील ध्येय-धोरणांसंदर्भात योग्य भूमिका घेतील. अशी शक्यता आहे. गेल्या पाच वर्षात त्यांचा संवाद निश्चितच कमी झाला हे वास्तव आहे. कारण त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी होती. राज्यातील दोन खात्यांचे मंत्रिपद, जिल्ह्यातील पालकमंत्रीपद, वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन, विविध शिक्षण संस्थांचे जाळे यामुळे त्यांचा स्थानिकला संपर्क कमी राहिला. परंतु ज्यांच्यावर मदार होती. त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. सामान्य माणूस आपला समजला नाही म्हणून तो माणूस पंकजाताईंपासून दूर गेला. परंतु एकदा चूक झाल्यानंतर सुधारण्यासाठी संधी दिली जाते. त्याप्रमाणे आता पंकजाताई लोकांमध्ये येणार आहेत. बोलणार आहेत. समजून घेणार आहेत आणि त्यानंतर दिशा ठरवणार आहेत. राजकीय निर्णय घेणे आज खूप कठीण होऊन बसले आहे. जो विचार आणि जो वारसा लाभलेला आहे. त्याचा विचार करता समोर एकही तसा पर्याय नसल्याचे दिसते. परंतु जर त्यांनी तसा काही विचार करण्याचा निर्णय किंवा निर्धार केला असेल तर ती बाब वेगळी असू शकते. पंकजाताईंनी बीड जिल्ह्यात गेल्या पाच वर्षाता भाजपाची एक हाती सत्ता ताब्यात घेतली. सहा आमदारापैकी पाच आमदार भाजपाचे निवडून आणले. लोकसभेवर भाजपचा खासदार, जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता असा काही सत्तेचा माहोल असतांना केवळ मनातील मुख्यमंत्री या शब्दाने देवेंद्रांना बोचले आणि तेथून वेगळे वातावरण सुरू झाले.

पंकजाताईंच्या पराभवामध्ये देवेंद्रांचे नाव जोडले गेले. पंकजाताईंच्या पराभवामध्ये निश्चितच देवेंद्रांचे नाव असू शकते. परंतु त्या पराभवाला विविध कारणे व किनार आहे. या सर्व प्रश्नांसंदर्भात स्वतः पंकजाताई तुमच्या आमच्याशी बोलणार आहेत. आपल्या मनाशी साद घालणार आहेत. शिवाय गेल्या पाच वर्षात जी गुज मनात सल करून आहे तिला वाट मोकळी करून देणार आहेत. शेवटी एकच वाटते की, पंकजाताई मुंडे यांना पराभूत झाल्यानंतर पक्षनेतृत्वाने अपेक्षित असा सन्मान आणि प्रक्रियेमध्ये सामावून घेतले नसल्याची खंत कोठेतरी दिसून येतेय शिवाय देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांच्या सहकार्याने जे सरकार बनवले त्याविषयी शब्द देखील विचारण्यात आला नाही. एकूणच कारणमीमांसा व त्याची उत्तरं 12 डिसेंबरला मिळणार आहेत. तोपर्यंत वृत्तवाहिन्यांच्या चर्चेमध्ये रममाण होऊया…..!

लेखक अंबाजोगाई येथील दैनिक वार्ता या वृत्तपत्राचे संपादक आहेत.

COMMENTS