नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार असलेल्या संदीप जोशींनी एकाच दगडात मारले दोन पक्षी, कसे ते पाहा?

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार असलेल्या संदीप जोशींनी एकाच दगडात मारले दोन पक्षी, कसे ते पाहा?

नागपूर – पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीसाठी चुरस पहायला मिळत आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज अंतिम तारीख आहे. 1 डिसेंबर रोजी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे. त्यानंतर 3 डिसेंबरला निकाल लागणार आहे. अर्ज दाखल करण्याची आज अंतिम तारीख असल्यामुळे सर्वच पक्षातील उमेदवार आज आपला उमेदवारी अर्ज भरत आहेत. नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून भाजपकडून संदीप जोशींनी आपला अर्ज दाखल केला आहे. अर्ज भरण्यापूर्वी जोशी यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरींचे आशीर्वाद घेतले आहेत. फॉर्म भरण्या पूर्वी आमचे नेते, आमचे प्रेरणा स्थान नितीनजी गडकरी यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले असल्याचं ट्वीट गडकरी यांनी केलं आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षाचे उमेदवार आता रिंगणात उतरले आहे. भाजपला मात्र, बंडखोरीचा फटका बसला आहे. नागपूरमध्येही भाजपमध्ये धुसफूस सुरू आहे. त्यामुळे भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांनी सर्वात आधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊनच आपला अर्ज दाखल केला आहे.

दरम्यान पदवीधर मतदारसंघासाठी नागपूरमधून नितीन गडकरी यांचे कट्टर समर्थक अनिल सोले यांना उमेदवारी दिली जाणार अशी चर्चा होती. पण, अनिल सोले यांचा पत्ता कट करण्यात आला. पदवीधर मतदारसंघासाठी संदीप जोशी यांना संधी मिळाली. अनिल सोले यांना उमेदवारी न दिल्यामुळे नितीन गडकरी गट नाराज असल्याची चर्चा रंगली होती. परंतु अर्ज भरण्याआधी संदीप जोशी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी जोशी यांनी गडकरींच्या पाया पडून आशिर्वाद घेतला. त्यामुळे जोशी यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारल्याची टर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

तर दुसरीकडे औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपमध्ये बंडखोरी झाली आहे.भाजपच्यावतीने अधिकृत उमेदवारी शिरीष बोराळकर यांना जाहीर केली असली तरी दोन जणांनी अर्ज भरल्याने पक्ष श्रेष्ठींसमोर पेच निर्माण झाला आहे. या मतदारसंघात भाजपच्या दोन इच्छुक उमेदवारांनी बंडखोरी केली आहे. माजी बीड भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी आज उमेदवारी अर्ज भरला. रमेश पोकळे हे पंकजा मुंडे गटाचे समर्थक मानले जातात. तर दुसरे बंडखोर उमेदवार प्रवीण घुगे यांनीही आज उमेदवारी अर्ज भरला आहे.

COMMENTS