शिवसेनेला एवढ्या जागा सोडा, दिल्लीहून निरोप आल्याने भाजप नेत्यांमध्ये संभ्रम !

शिवसेनेला एवढ्या जागा सोडा, दिल्लीहून निरोप आल्याने भाजप नेत्यांमध्ये संभ्रम !

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती जवळपास निश्चित मानली जात आहे. परंतु दोन्ही पक्षातील जागावाटपाचा तिढा अजून वाढत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे केंद्रातील नेत्यांनी आता याकडे लक्ष घातले आहे. विधानसभेसाठी शिवसेनेला ११५ ते १२० जागा सोडा, त्यापेक्षा अधिक नको, असा निरोप दिल्लीहून आला असल्याची चर्चा आहे. त्यामुळे राज्यातील भाजप नेत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
तसेच महायुतीमध्ये असलेल्या लहान मित्रपक्षांना १८ जागा सोडण्यात याव्यात अशा सूचनाही भाजपच्या श्रेष्ठींनी राज्याच्या नेत्यांना केली असल्याची माहिती आहे.

दरम्यान शिवसेनेला १२० ते १२६ पर्यंत जागा सोडण्याची तयारी राज्यातील भाजपच्या नेतृत्वाने शिवसेनेशी चर्चा करताना दर्शविली होती. सन्मानाने युती करायची, तर शिवसेनेला १२६ जागा सोडायला हव्यात, अशी भूमिका राज्यातील भाजपच्या नेत्यांनी घेतली होती.
मात्र, विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे राज्य प्रभारी भूपेंद्र यादव यांनी मुंबईत दोन दिवस मुक्काम करून संपूर्ण बारीकसारीक तपशील जाणून घेतला. त्यानंतर दिल्लीत श्रेष्ठींशी चर्चा केली आणि शिवसेनेला १२० पर्यंत जागा सोडाव्यात, अशी भूमिका घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे आता शिवसेना काय निर्णय घेणार हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS