“…तर पंचायतींसह लोकसभा, विधानसभा निवडणुकांवरही बहिष्कार घालणार !”

“…तर पंचायतींसह लोकसभा, विधानसभा निवडणुकांवरही बहिष्कार घालणार !”

नवी दिल्ली – जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांनी केंद्र सरकारला इशारा दिला आहे. जर केंद्र सरकारने काश्मीरबाबतचे कलम ३५ अ आणि ३७० संदर्भात भूमिका स्पष्ट केली नाही तर आम्ही पंचायतींसह लोकसभा, विधानसभा निवडणुकांवरही बहिष्कार घालू असं अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे. यापूर्वीही त्यांनी कलम ३५ अ मध्ये बदल करू देणार नसल्याचा इशारा दिला होता.  त्यानंतर त्यांना आता निवडणुकांवरच बहिष्कार घालणार असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान जम्मू आणि काश्मीरमध्ये सध्या अस्तित्वात असणाऱ्या कलम ३५ अ हा मुद्दा संवेदनशील आहे. कलम ३५ अ नुसार जम्मू आणि काश्मीरचा कायमचा निवासी नसलेल्या कोणत्याही भारतीय नागरिकाला स्थावर मालमत्ता विकत घेता येत नाही तसेच त्यांना कायमचा निवारा सुद्धा मिळू शकत नाही, सरकारी नोकऱ्या सुद्धा मिळवता येऊ शकत नाहीत.

तसेच कलम ३७० नुसार जम्मू आणि काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देताना काही तरतुदी केल्या होत्या. राज्यात कोणताही कायदा लागू करण्याआधी केंद्र सरकारला राज्याची परवानगी घेणे आवश्यक आहे. तसेच राज्यातील नागरिकांना दुहेरी नागरिकत्व तसेच राज्याच्या घटनेला बरखास्त करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना नाही. राज्यात आणीबाणी लागू करता येत नाही.

त्यामुळे या दोन्ही कलमांबाबत केंद्र सरकारनं आपली भूमिका स्पष्ट करावी अन्यथा आगामी सर्व निवडणुकांवर बहिष्कार घातला जाणार असल्याचं फारुक अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे. त्यामुळे याबाबत केंद्र सरकार काय भूमिका घेतं, याकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS