राज्यात दोन लोकसभा आणि एका विधानसभेसाठी पोटनिवडणूक जाहीर !

राज्यात दोन लोकसभा आणि एका विधानसभेसाठी पोटनिवडणूक जाहीर !

मुंबई – राज्यातल्या भंडारा-गोंदिया आणि पालघर या लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्याचसोबत पलूस कडेगाव या विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचाही कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. येत्या 28 मेला मतदान होणार असून 31 मे रोजी मतमोजणी होणार आहे. या पैकी लोकसभेच्या दोन्ही जागा भाजपकडे आहेत. तर विधानसभेची एक जागा काँग्रेसकडे आहे. नाना पटोले यांच्या राजीनामम्यामुळे भंडारा गोंदिया लोकसभेची पोटनिवडणूक होत आहे. तर  पालघरमध्ये भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे  पोटनिवडणूक होत आहे. तर ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या निधनामुळे पलूस कडेगावमध्ये पोटनिवडणूक होणार आहे.

या पोटनिवडणुकीत ख-या अर्थानं भाजपचा कस लागण्याची शक्यता आहे. देशात उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, पंजाब या ठिकाणी झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला आहे. त्यामुळे या जागा भाजप टिकवणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. लोकसभेच्या दोन्ही जागा भाजपकडे आहेत. युतीमधले सध्याचे संबंध पाहता शिवसेना या दोन्ही ठिकाणी उमेदवार देण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामिण भागातील नाराजीसोबतच मित्र पक्षाच्या उमेदवारामुळे भाजपच्या मतांमध्ये मोठी फूट पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपचे धुरंदर आता कशा प्रकारे या परिस्थितीला तोंड देतात ते पहावं लागेल.

दुसरीकडे आघाडीमध्येही सार कांही आलेबल नाही. पालघरची जागा काँग्रेसकडे होती. त्यामुळे तिथे फारसा वाद होण्याची शक्यता नाही. मात्र भंडारा गोंदियाच्या जागेवार आघाडीत ठिणगी पडण्याची शक्यता आहे. ही जागा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्याकडे आहे. मात्र नाना पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे काँग्रेसनंही या जागेवर दावा सांगितला आहे. याच्यातून आघाडीत कसा तोडगा निघतो याकडे पहावं लागेल.

पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातून पतंगराव कदम यांचे पुत्र आणि युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम यांना उमेदवार मिळण्याची शक्यता आहे. त्या ठिकाणी शिवसेना उमेदवार देते का ते पहावं लागेल. आघाडीत मात्र या जागेवरुन वाद होण्याची शक्यता नाही. भाजप तिथून उमेदवार देणार का ते पहावं लागेल.

COMMENTS