विदर्भातील शेतक-यांचं आंदोलन चिघळणार, आशिष देशमुखांसह शेतक-यांचा आक्रमक पवित्रा !

विदर्भातील शेतक-यांचं आंदोलन चिघळणार, आशिष देशमुखांसह शेतक-यांचा आक्रमक पवित्रा !

नागपूर – भाजपवर नाराज असलेले आमदार आशिष देशमुख यांचं नागपुरात तीव्र आंदोलन सुरु आहे. गारपीटग्रस्त शेतक-यांना मदत न मिळाल्यामुळे त्यांनी शेतक-यांसह मंगळवारी रास्तारोको आंदोलन केलं होतं. परंतु या आंदोलनादरम्यान पोलिसांनी त्यांच्यासह अनेक शेतक-यांवर गुन्हे दाखल केले आहेत. मदत करायची सोडून सरकारनं शेतक-यांवर गुन्हे दाखल केले असल्यामुळे आता तीव्र आंदोलनाचा इशारा आमदार आशिष देशमुख यांनी दिला आहे.

दरम्यान गारपिटीमुळे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. संत्रा, गहू, हरभरा, भाजीपाला ही पिकं भुईसपाट झाली आहेत. त्यामुळे मंगळवारी नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी शेतकऱ्यांनी नागपूर-अमरावती महामार्गावर आणि काटोल परिसरात रास्तारोको आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान रस्त्यांवर वाहतूककोंडी झाली होती. त्यामुळे काटोल पोलीसांनी आ. आशिष देशमुख यांच्यासह आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर ३४१, ३४३ आणि मुंबई पोलीस कायद्याच्या १३५ कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. त्यासोबतच काटोलजवळील धुमषेठफाटा या ठिकाणीही गारपीटग्रस्त शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन केले होते. बेकायदा मंडळी जमवून परवानगी न घेता रास्तारोको आंदोलन केल्यामुळे हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सरकानं मदत करण्याऐवजी गुन्हे दाखल केल्यामुळे आमदार देशमुख यांच्यासह अनेक शेतकरी आता आक्रमक झाले आहेत. आक्रमक झालेल्या शेतक-यांनी आता तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे हे आंदोलन आता चिघळणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS