मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांची केंद्रीय पथक करणार पाहणी !

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांची केंद्रीय पथक करणार पाहणी !

मुंबई – मराठवाड्यातील दुष्काळस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक येणार आहे. येत्या 5 ते 7 डिसेंबरपर्यंत केंद्राचं पथक मराठवाड्यात राहणार असल्याची माहिती आहे. या दौ-यादरम्यानन मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा हे पथक घेणार आहे.मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांचा दौरा हे पथक करणार आहे. केंद्रीय पथकाच्या पाहणीनंतरच या विभागातील शेतक-यांना सरकारकडून मदत दिली जाणार आहे.

दरम्यान 76 पैकी 27 तालुक्यांत गंभीर, तर 14 तालुक्यांत मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असल्याचं राज्य सरकारनं जाहीर केलं आहे. महाराष्ट्र सुदूर संवेदन यंत्रणे(एमआरसॅक)कडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार दुष्काळाची दुसरी कळ लागू झालेल्या तालुक्यांची यादी राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख समितीने जाहीर केली आहे. एमआरसॅक सॅटेलाईटनुसार काम करणारी यंत्रणा आहे. त्याआधारे शासनाने मराठवाड्यातील २७ तालुक्यांना दुसरी कळ लागू केली आहे. गंभीर आणि मध्यम स्वरूपाचा दुष्काळ त्याअंतर्गत विचारात घेतला गेला आहे.

दुष्काळाची दुसरी कळ
औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद, गंगापूर, खुलताबाद, पैठण, फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव, वैजापूर या तालुक्यांत गंभीर दुष्काळ आहे, तर कन्नड तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ.

बीड जिल्ह्यातील आष्टी, बीड, धारूर, गेवराई, माजलगाव, शिरूर, वडवणी तालुक्यांत गंभीर, तर अंबाजोगई, केज, परळी, पाटोदा तालुक्यांत मध्यम स्वरूपाचा दुष्काळ. हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, सेनगावमध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ.

जालना जिल्ह्यातील अंबड, बदनापूर, भोकरदन, घनसावंगी तालुक्यांत गंभीर स्वरूपाची, तर जाफ्राबाद, जालना आणि परतूर तालुक्यांत मध्यम स्वरूपाची दुष्काळ .

परभणी जिल्ह्यातील मानवत, पाथरी, सोनपेठमध्ये गंभीर दुष्काळी स्थिती आहे, तर पालम, परभणी, सेलू तालुक्यांत मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असल्याचे सांगण्यात आले आहे.
नांदेड जिल्ह्यातील मुखेड, उमरी तालुक्यांत गंभीर, तर देगलूर तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

तर लातूर आणि उस्मानाबाद हे दोन्ही जिल्हे सुजलाम् सुफलाम् असल्याचे दुष्काळच्या दुस-या कळीनुसार सांगण्यात येत आहे. लातूरमधील शिरूर अनंतपाळ परिसरात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ आहे, तर उस्मानाबादमधील लोहारा भागात तशीच स्थिती असल्याचे सांगण्यात आले आहे.

राज्य सरकारच्या या अहवालानंतर आता केंद्र सरकार मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांची पाहणी करणार आहे. आणि त्यानंतर मदत केली जाणार आहे. त्यामुळे केंद्रीय पथकाच्या या दौ-याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS