पथके येतात अन जातात मदत मात्र, भेटत नसल्याची शेतकऱ्यांची व्यथा

पथके येतात अन जातात मदत मात्र, भेटत नसल्याची शेतकऱ्यांची व्यथा

उस्मानाबाद : दोन महिन्यांपूर्वी राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सोमवारी केंद्रीय पथकाकडून पाहणी करण्यात आली. केंद्रीय पथक उस्मानाबाद जिल्ह्यात शेतकऱ्याच्या बांधावर पोहचले. यावेळी शेतकऱ्यांनी या पथकासमोर समस्यांचा पाढा वाचला. अनेक शेतकऱ्यांनी या पाहणी दौऱ्यावर नाराजी व्यक्त केली. नेते, पथके येतात जातात, आमचा वेळ खाऊन जातात. मात्र, मदत भेटत नाही, अशा शब्दांमध्ये शेतकऱ्यांनी या पाहणी पथकावर नाराजी व्यक्त केली.

अतिवृष्टीमुळे शेत जमीन उखडून गेली त्यामुळे शेत जमीनीचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे शेत जमिनीच्या दुरुस्तीसाठी केंद्र सरकारच्या एनडीआरएफच्या नियमानुसार जमिनीची दुरुस्ती आणि जमिनीच्या मशागतीसाठी मदत करावी तसेच पंतप्रधान पीक विमा योजनेच्या नियमामध्ये सुट देवून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशा आशयाचे निवेदन भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी यावेळी पथकास दिले.

यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सडकून टीका केली आहे. केंद्रीय पथकाने अतिवृष्टीची आत्ता पाहणी करणं म्हणजे पेशंट दगावल्यानंतर डॉक्टर येणं असला प्रकार आहे, असं मत रोहित पवार यांनी व्यक्त केलं. यावेळी त्यांनी केंद्र सरकारने अन्नदात्याची अशी चेष्टा करू नये, पथक नको मदत पाठवा अशीही मागणी केली.

पथकाच्या या पाहणीवर राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे म्हणाले, “शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. राज्य सरकारने केंद्राकडे वारंवार मदत करावी अशी मागणी केली होती. मात्र या मागणीकडे दुर्लक्ष केलं गेलं. आता शास्त्रीय पद्धतीने पाहणी करावी म्हणजे नुकसान दिसेल. मुख्यमंत्र्यांनी या अगोदरच या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत केली आहे.”

दुसरीकडे भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी राज्य सरकारवर हल्ला चढवत मोदी सरकारची बाजू घेत सारवासारव केलीय. ते म्हणाले, “राज्य सरकारने उशिराने नुकसानीची माहिती आणि मेमोरेंडम पाठविल्याने केंद्रीय पथक पाहणीसाठी उशिराने आले. राज्य सरकारने उशीर केल्याने केंद्राची मदत मिळायला उशीर झाला. केंद्रीय पथक उशिराने आलं असलं तरी केंद्र सरकारकडून नक्की मदत मिळेल.”

दरम्यान, केंद्रीय पथक मंगळवारी अतिवृष्टी झालेल्या नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी पुण्यात येणार आहे. यावेळी दौंड, इंदापूर, बारामतीमधील नुकसानग्रस्त भागांची पाहणी होणार आहे.

COMMENTS