अजित पवारांच्या याच जखमेवर ठेवलं छगन भुजबळांनी बोट!

अजित पवारांच्या याच जखमेवर ठेवलं छगन भुजबळांनी बोट!

नाशिक – दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेच्या विषयावरून आता राष्ट्रवादीतील दिग्गज नेत्यांची आपापसात जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच अजित पवारांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. अजित पवारांच्या याच जखमेवर बोट ठेवत भुजबळ यांनी शरद पवार ज्या दिवशी ईडी कार्यालयात जाणार होते, त्याच दिवशी अजित पवारांनी राजीनामा द्यायला नको होता. त्यांच्या राजीनाम्यामुळे फोकस बदलला असल्याचं भुजबळ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान बाळासाहेबांच्या अटकेला विरोध होता पण विभागप्रमुखांच्या हट्टामुळे कारवाई झाली, असं सांगत थेट छगन भुजबळ यांच्यावरच अजित पवार यांनी खापर फोडलं होतं. त्यावर भुजबळांनी चोख प्रत्युत्तर दिलं असून ज्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ईडी कार्यालयात जाणार होते. त्याच दिवशी अजित पवारांनी राजीनामा देण्याची आवश्यकता नव्हती. बँकेचं सदस्य आणि संचालक नसताना त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. त्यामुळे वातावरण तापलं. पण काही वेळानं वातावरण बदललं आणि फोकसही बदलला. अजित पवार भावनाप्रधान आहेत हे मान्य पण दोन दिवस भावना आवरल्या असतं तर बरं झालं असतं असं भुजबळ यांनी म्हटलं आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असतानाच राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला असल्याचं दिसत आहे.

COMMENTS