चंद्रकांत पाटील यांना क्लीन चिट

चंद्रकांत पाटील यांना क्लीन चिट

पुणे : विधानसभा निवडणुकीत खोटं शपथपत्र दाखल केल्याच्या आरोपातून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची सुटका झाली आहे. चंद्रकांतदादांनी विधानसभा निवडणुकीत खोटं प्रतिज्ञापत्र दाखल केलं नसल्याचा निकाल देत पुण्यातील फौजदारी न्यायालयाने क्लीन चिट दिली. हा सत्याचा विजय असल्याची भावनिक प्रतिक्रिया चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केली.

पुण्यातील कोथरुड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक जिंकल्यावर चंद्रकांत पाटील यांनी खोटे शपथपत्र दाखल केल्याचा आरोप करत अभिषेक हरिदास यांनी चंद्रकांत पाटील यांच्या निवडीविरुद्ध दाद मागितली होती. फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 202 अंतर्गत पुण्यातील फौजदारी न्यायालयात याबाबतचा खटला दाखल करण्यात आला होता. न्यायाधीश जान्हवी केळकर यांनी विस्तृत निकालपत्रात चंद्रकांत पाटलांविरुद्ध असलेले सर्व आरोप फेटाळून लावले. सदर तक्रार काढून टाकली आणि खटलाही निकाली काढला.

यावर चंद्रकांत पाटील म्हणाले,“एका सामान्य गिरणी कामगाराचा मुलगा राज्यातील महत्त्वाच्या खात्यांचा मंत्री होतो. भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदापर्यंत वाटचाल करतो, हे काही हितशत्रूंना मानवत नाही. त्यातून माझ्याविरुद्ध कुभांड रचले जाते आणि मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र अखेर सत्याचाच विजय होतो, हे न्यायालयाच्या निकालाने दाखवून दिले” अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. अशा आरोपांची आता सवय झाली असून खोट्या आरोपांमुळे अनावश्यक मानसिक त्रास होतो, मात्र अशा कट कारस्थानातून मी अधिक तावून सुलाखून बाहेर पडतो. समाजसेवेचे जे व्रत स्वीकारले आहे, ते पूर्ण करण्यासाठी पुन्हा सज्ज होतो, असे भावनिक उद्गार चंद्रकांतदादांनी काढले.

COMMENTS