नाथाभाऊ दोन थोबाडीत मारा, पण  घरची भांडणं जगासमोर आणू नका – चंद्रकांत पाटील

नाथाभाऊ दोन थोबाडीत मारा, पण घरची भांडणं जगासमोर आणू नका – चंद्रकांत पाटील

मुंबई – नाथाभाऊ आम्हाला मुक्ताईनगरात नेऊन दोन थोबाडीत मारा, पण घरची भांडणं जगासमोर आणू नका असं आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. विधान परिषदेची उमेदवारी न मिळाल्यामुळे एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे हे दिग्गज नेते नाराज असल्याची चर्चा आहे. एकनाथ खडसे यांनी तर जाहीर नाराजी व्यक्त केली. याबाबत आज चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नाथाभाऊ आमचे वडील आहेत. नाथाभाऊंसाठी तिकीट हा क्षुल्लक विषय आहे. त्यांची पक्षाशी नाळ जोडली गेली आहे. देवेंद्र फडणवीस आणि नाथाभाऊ यांचं सविस्तर बोलणं झालं आहे. जर लॉकडाऊन नसता तर मी स्वत: चारवेळा मुक्ताईनगरला गेलो असतो. नाथाभाऊंना पक्षाकडून खूप मिळालं. अजून मिळायला हवं. पण मिळालं नाही म्हणून लगेच पक्ष सोडण्याची भाषा करु नये, ते आमचे मार्गदर्शक आहेत, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

नाथाभाऊ हे मुरलेले हुशार राजकारणी आहेत. ते बुडत्या जहाजात बसणार नाहीत. काँग्रेसने त्यांना ऑफर दिली तर मग पहिली सीट का नाही दिली? त्यांनी सहाव्या जागेची का ऑफर दिली?, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. त्यामुळे यावर आता एकनाथ खडसे काय बोलणार हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS