आमदार दलित असल्यामुळे पोस्टरवर फोटो छापला नाही, भाजपच्या नगरसेवकांचा भाजपच्याच महापौरांवर आरोप !

आमदार दलित असल्यामुळे पोस्टरवर फोटो छापला नाही, भाजपच्या नगरसेवकांचा भाजपच्याच महापौरांवर आरोप !

चंद्रपूर – आमदार दलित असल्यामुळे पोस्टरवर फोटो छापला नसल्याचा आरोप भाजपच्या नगरसेवकानं भाजपच्याच महापौरांवर केला आहे. चंद्रपूरमध्ये महापौर चषक कुस्ती स्पर्धा सुरु होत आहेत. या स्पर्धेसाठी लावण्यात आलेल्या जाहिरातींच्या पोस्टर्समध्ये चंद्रपूर शहराचे आमदार नाना शामकुळे यांचा फोटो लावण्यात आला नाही. त्यामुळे भाजप नगरसेवकांच्या एका गटाने चांगलाच संताप व्यक्त केला आहे.

शहरात होत असलेल्या महापौर चषक स्पर्धेसाठी गांधी चौकात भव्य शामीयाना उभारण्यात आला आहे. या शामियानातील मंचावर मोठा फलक लावण्यात आला आहे. त्यावर पक्षाचे केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह पदाधिका-यांचे फोटो झळकवण्यात आले आहेत. परंतु तेथील स्थानिक आमदार नाना शामकुळे यांचा फोटो लावला नाही. त्यामुळे ते नगरसेवकांनी आता महापरांवर आरोप केला असून ते केवळ दलित असल्यामुळेच त्यांचा फोटो लावला नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

 

महापालिकेवर भाजपची सत्ता आहे. त्यामुळं फलकावर मोठ्या नेत्यांचे फोटो असणं स्वाभाविक आहे. मात्र, हे करताना भाजपचेच चंद्रपूरचे आमदार नाना श्यामकुळे यांचा फोटो छापण्याचं भान कुणालाही राहिलं नाही. सर्व स्थानिक नेत्यांचे फोटो असताना एकट्या आमदाराचाच आणि तोही स्वपक्षाच्या आमदाराचा फोटो न दिसल्यानं पक्षातीलच नगरसेवक संतापले आहेत. विशेष म्हणजे नाना श्यामकुळे यांचा फोटो न छापण्याची ही तिसरी घटना असून यापूर्वीही श्यामकुळे यांच्यासंदर्भात अशा घटना घडल्या आहेत.त्यामुळे आमदार शामकुळे हे दलित असल्यानं त्यांच्यावर असा अन्याय केला जातो. हा अन्याय खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा आता भाजपच्याच नगरसेवकांनी दिला आहे. मात्र महापौर अंजली घोटेकर यांनी हा प्रकार चुकून झाल्याचं सांगितलं आहे. यात कुणाचीही चुक नाही, असं सांगतानाच पक्षाच्या नगरसेवकांनी यावर राजकारण करायला नको असं ही सांगायला त्या विसरल्या नाहीत.

COMMENTS