देशभरातील विद्यार्थी नेते मुंबईत येणार एकाच मंचावर !

देशभरातील विद्यार्थी नेते मुंबईत येणार एकाच मंचावर !

मुंबई – देशभरातील विद्यार्थी नेते लवकरच एका मंचावर दिसणार आहेत. हा कार्यक्रम मुंबईत पार पडणार असून छात्र भारती या विद्यार्थी संघटनेच्या पुढाकाराने ४ जानेवारी २०१८ ला मुंबईत राष्ट्रीय छात्र सम्मेलन होणार आहे. यावेळी देशभरातले लढाऊ विद्यार्थी नेते एका मंचावर पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत. गुजरातमधल्या सामाजिक क्रांतीचा अविष्कार असणारे आमदार जिग्नेश मेवाणी, लढाऊ विद्यार्थी नेते उमर खालिद, रिचा सिंह, प्रदीप नरवाल, बेदाब्रता गोगई, छात्रभारतीचे अध्यक्ष दत्ता ढगे हे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार असून विलेपार्ले येथील मिठीबाई विद्यालयातील भाईदास सभागृहामध्ये सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत हे सम्मेलन पार पडणार आहे.

या संम्मेलनामध्ये विविध विषयांबरोबर विद्यार्थ्यांच्या काही कळीच्या प्रश्नांवरही चर्चा केली जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. विद्यार्थी चळवळीसमोरची आव्हानं आणि विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न यावर सम्मेलनात दिवसभर विचारमंथन केलं जाणार आहे. राज्यभरातील विद्यार्थी या संम्मेलनात सहभागी होणार आहेत. समारोपाच्या वेळी  आमदार जिग्नेश मेवाणी यांचा सत्कार आमदार कपिल पाटील यांच्या हस्ते केला जाणार असून गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवाणी या कार्यक्रमात काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS