दादा अन् पंतांच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी-भाजप कार्यकर्त्यांचा सामना

दादा अन् पंतांच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी-भाजप कार्यकर्त्यांचा सामना

पुणे: पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीत भामा आसखेड पाणी प्रकल्पाचा उद्घाटन सोहळ्यात पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर आज एकत्र आले होते. दरम्यान, सभागृहाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने उभे ठाकले. यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी व हुल्लडबाजी करण्यात आल्याने वातावरण चांगलेच तापले होते.

पुण्यातीतील भामा आसखेड पाणी प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभाच्या निमित्ताने अजित पवार व देवेंद्र फडणवीस हे दोन नेते बऱ्याच कालावधीनंतर एकाच व्यासपीठावर येत असल्याने तिथे काय होणार, याची उत्सुकता सर्वांनाच होती. मात्र, प्रत्यक्षात या दोन नेत्यांची भाषणं दूरच राहिली आणि कार्यकर्त्यांच्या गोंधळानेच कार्यक्रम चर्चेत आला. करोनामुळे नियमांचे बंधन असले तरी या कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली. सभागृहाबाहेर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यातूनच गोंधळाला सुरुवात झाली. भामा आसखेड पाणी प्रकल्पाचं श्रेय घेण्यावरून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. ‘एकच वादा अजित दादा’ विरुद्ध ‘पुण्याची ताकद गिरीश बापट’, अशा घोषणा देत कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकले. यात काही प्रमाणात हुल्लडबाजीही पाहायला मिळाली.

कार्यक्रमात फडणवीसांनी फटकेबाजी केली. एकाच मंचावर येणार म्हणजे काय….. आम्ही कुस्ती खेळणार होतो की गाणं गाणार होतो? असं काहीही नसताना मीडियाने दोन दिवस आपल्याच बातम्या दाखवल्या. अजितदादा, मला असं वाटतं की जर दोन-तीन दिवसांच्या बातम्या द्यायच्या असतील तर एकतर तुम्ही मला चहाला तुमच्या घरी बोलवा किंवा तुम्ही माझ्या घरी चहाला या. म्हणजे दोन-तीन दिवस आपल्या बातम्या चालत राहतात”, अशी मजेशीर शाब्दिक फटकेबाजी देवेंद्र फडणवीस यांनी केली.

COMMENTS