भविष्यात वंचित बहुजन आघाडी विरोधी पक्षात, शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष काही जिल्ह्यांपुरता मर्यादीत – मुख्यमंत्री

भविष्यात वंचित बहुजन आघाडी विरोधी पक्षात, शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष काही जिल्ह्यांपुरता मर्यादीत – मुख्यमंत्री

नांदेड –  शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष आता केवळ काही जिल्ह्यांपुरता मर्यादीत राहिला असून भविष्यात वंचित बहुजन आघाडी विरोधी पक्षात असेल, असं भाकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्तवलं आहे. मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा नांदेडमध्ये पोहोचली आहे. यावेळी पत्रकरांशी बोलतांना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या वेळी वंचित बहुजन आघाडी ही भाजपाची बी टीम असल्याची टीका विरोधकांनी केली होती. यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी वंचित टीम ए आणि काँग्रेस बी टीम झाल्याचे लोकसभा निवडणूक निकालानंतर स्पष्ट झाले असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आमचा खरा संघर्ष वंचित बहुजन आघाडीसोबत असणार आहे आणि विधानसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्ष नेता वंचित बहुजन आघाडीचा असेल असाही विश्वास मुख्यमंत्र्यांनी नांदेडमध्ये बोलताना व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी आता ज्योतिषाचे काम करावे असा खोचक सल्ला त्यांनी दिला आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. देशभरात जे विरोधक भाजपात येणार नाही त्यांच्याविरोधात चौकशी लावली जाते आहे. चौकशी लावू अशी धमकीही त्यांना दिली जाते आहे. फक्त राष्ट्रवादीच्याच नेत्यांना नाही तर काँग्रेसच्या नेत्यांनाही अशाचप्रकारे धमक्या देऊन भाजपात घेतले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

COMMENTS