तुम्हाला जी मुलगी आवडली, ती पळवून आणा असं सांगणारे निवडून येतात, ते इथे आहेत – उद्धव ठाकरे

तुम्हाला जी मुलगी आवडली, ती पळवून आणा असं सांगणारे निवडून येतात, ते इथे आहेत – उद्धव ठाकरे

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महिला सुरक्षेवरुन विधान परिषदेत विरोधकांवर हल्लाबोल केला. तुम्हाला जी मुलगी आवडली, ती पळवून आणा असं, सांगणारे राजकारणी आहेत, ते निवडून येतात. ते इथे आहेत. सैनिकांच्या पत्नीबद्दल बोलणारे इथे आहेत. मतांच्या राजकारणासाठी एवढे आपण आगतिक आहोत असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर टीका केली. महिला अत्याचारांची जबाबदारी सरकार म्हणून टाळणार नाही. मात्र, संस्कार हा विषय अत्यंत महत्वाचा आहे, तो घराघरात रुजवायला हवा, असंही ते म्हणाले.

येत्या महिला दिनाच्या निमित्तानं विधान परिषदेत आज महिलांच्या शाश्वत विकासाची उद्दिष्ट आणि महिला सक्षमीकरण याबाबतचा ठराव उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मांडला. या प्रस्तावावरील चर्चेला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं.

दरम्यान महिला अत्याचारांना चाप लावायचा असेल, तर संस्कारक्षम समाज निर्माण करण्याची गरज आहे. याची सुरुवात प्रत्येकानेच आपल्या घरापासून केली, तरच खऱ्या अर्थानं महिला सक्षमीकरण होईल, फक्त कायदे कडक करुन चालणार नाहीत, तर पक्षाच्या आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन चांगला समाज घडवायचा असेल, तर नतद्रष्टांचा माज उतरवायला हवा, महिलेचा अपमान करणारा राज्यकर्ता असूच शकत नाही असंही यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.

COMMENTS