राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्याची मुख्यमंत्र्यासोबत अर्धातास बंद खोलीत चर्चा !

राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्याची मुख्यमंत्र्यासोबत अर्धातास बंद खोलीत चर्चा !

बीड – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज बीड जिल्ह्याच्या दौ-यावर आहेत. बीड जिल्ह्यातील दौ-याला सुरूवात करण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी जयदत्त क्षीरसागर यांच्या घरी बंद खोलीत जवळपासस अर्धा तास चर्चा केली. विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे उपनेते असलेले जयदत्त क्षीरसागर हे गेले काही दिवस राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज असल्याची चर्चा आहे. पक्षाकडून पुतणे संदीप क्षीरसागर यांना बळ दिले जात असल्यामुळे ते भाजपच्या संपर्कात असल्याचीही चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केवळ जयदत्त क्षीरसागर यांच्या घरी भेटच दिली नाही तर मुंबई ते औरंगाबाद हा विमान प्रवास तसंच औरंगाबाद ते बीड हा हेलिकॉप्टरचा प्रवास दोन्ही नेत्यांनी एकत्र केला. गेल्या काही दिवसांपासून जयदत्त क्षीरसागर हे पक्षापासून दुरावले असल्याचं दिसून येत आहे. अजित पवारांच्या बीड दौ-यात जयदत्त क्षीरसागर हे कायम दूर राहिले आहेत. एवढच नाही तर अजित पवारांच्या दौ-याच्यावेळी ते जिल्हाबाहेर जातात असा गेल्या काही दिवसातला अनुभव आहे. मुख्यमंत्र्यांना मात्र त्यांनी जेवणासाठी खास आमंत्रण दिलं होतं. त्यावेळी दोन्ही नेत्यांनी सुमारे अर्धा तास गुप्तगू केलं.

आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेऊन क्षीरसागर हे भाजपची कास धरण्याची शक्यता आहे. भाजपाच्या तिकीटावर ते निवडणूक लढवतील असे आखाडे बांधले जात आहेत. तर संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणुक लढवतील अशी शक्यता वर्तविली जात आहे.

COMMENTS