मुख्यमंत्र्यांनी ‘त्या’ मंत्र्यांना सुनावले खडे बोल !

मुख्यमंत्र्यांनी ‘त्या’ मंत्र्यांना सुनावले खडे बोल !

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्र्यांचे कान उपटले आहेत. मंत्रीमंडळ बैठकीला गैरहजर राहणाऱ्या आणि उशीरा येणाऱ्या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी खडे बोल सुनावले आहेत. मंत्रीमंडळ बैठकीशिवाय कोणतेही काम महत्त्वाचे असू शकत नाही. ही आपली प्रमुख जबाबदारी आहे. अनेक मंत्री मंत्रीमंडळ बैठकीला दांडी मारत असल्याने किंवा उशीरा येत असल्याने मुख्यमंत्री संतप्त झाले होते. वाढदिवस, मतदारसंघातील कार्यक्रमाचे कारण देऊन अनेक मंत्री मंत्रीमंडळ बैठकीला गैरहजर राहतात. यापुढे मंत्रीमंडळ बैठकीला उशीरा येणार्‍या मंत्र्यांना बैठकीत प्रवेश न देण्याची मुख्यमंत्र्यांची भूमिका घेतली आहे. आज मंत्रीमंडळ फेरबदलाची चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्र्यांनी बेशिस्त मंत्र्यांना धारेवर धरले होते.

दरम्यान मुख्यमंत्र्यांनी खडे बोल सुनावल्यानंतर शिवसेनेचे मंत्री मात्र गैरहजर रहायचं असेल तर रितसर मुख्यमंत्र्यांना पत्र देतात किंवा उशीरा येणार असतील तर तशी सूचना देतात असा दावा शिवसेना मंत्र्यांनी केला आहे.

दरम्यान शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना मंत्रीमंडळ बैठक सुरू झाली की सभागृहाचे दार बंद केले जायचे, उशीरा येणार्‍या मंत्र्यांना तेव्हा बैठकीत प्रवेश दिला जात नव्हता. तसेच मनोहर जोशींच्या काळात सकाळी 9 वाजता होणार्‍या मंत्रीमंडळ बैठकीला मंत्री वेळेवर हजर रहायचे. याचाच दाखला देत मुख्यमंत्र्यांनी उशीरा येणा-या मंत्र्यांचे कान उपटले आहेत.

COMMENTS