‘कोरोना’चा सामना करणे हे एकप्रकारचे युद्धच, त्यामुळे भोंगा वाजलाय सावध राहा – मुख्यमंत्री

‘कोरोना’चा सामना करणे हे एकप्रकारचे युद्धच, त्यामुळे भोंगा वाजलाय सावध राहा – मुख्यमंत्री

मुंबई – कोरोना व्हायरसच्या राज्यातील वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी कोरोना विषाणूचा सामना करणे हे एकप्रकारचे युद्ध आहे. युद्धाचा भोंगा वाजलाय. त्यामुळे नागरिकांनी सावध होऊन सरकारने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्याचं आवाहन त्यांनी केले आहे. बस आणि ट्रेनची गर्दी कमी झाली असली तरी अजूनही काही जणांकडून अनावश्यक प्रवास होत आहे. कोरोना विषाणू एकएक पाऊल पुढे टाकत आहे. त्यामुळे आत्ताच सावध होणे गरजेचे आहे. घाबरून जाण्याची गरज नाही. कोरोनाचा सामना करण्यासाठी आपण पूर्णपणे सज्ज आहोत. शेवटी युद्ध ही जिद्दीवरच जिंकली जातात, असही उद्धव ठाकरे म्हणालेत.

तसेच उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या संकटाची तुलना १९६५ आणि १९७१ च्या युद्धाशी केली आहे. त्यावेळी भोंगा वाजला की लोक आपापल्या घरात जाऊन लपायचे. घरातील दिव्यांचा प्रकाशही बाहेर येऊन दिला जायचा नाही. जेणेकरून शत्रूला आपला पत्ता लागणार नाही. कोरोनाविरुद्धची लढाई हेदेखील वेगळ्याप्रकारचे युद्ध आहे. अशावेळी नागरिकांनी घरात राहून सरकारी यंत्रणेवरील ताण कमी करणे गरजेचे आहे. रुग्णालये आणि इतर अत्यावश्यक सेवांमधील कर्मचारी आपल्यासाठी २४ तास झटत आहेत. त्यांनाही कोरोना व्हायरसची लागण होण्याची भीती आहे. मात्र, भारतीय जवानांप्रमाणे जीवावर उदार होऊन हे कर्मचारी आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळे आपण त्यांना सहकार्य करावे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS