…तर सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेणार – भाई जगताप

…तर सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेणार – भाई जगताप

मुंबई – ईव्हीएमबाबतची शंका दूर करण्यासाठी युतीचे उमेदवार निवडून आलेल्या ठिकाणांपैकी २५ जागांवर बॅलेट पेपरच्या सहाय्यानं निवडणुका घेण्याची मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कुलाबा मतदारसंघातील उमेदवार भाई जगताप यांनी केली आहे. बॅलेट पेपरवरील निकाल आणि ईव्हीएमवरील निकाल सारखा लागल्यास पुन्हा हा मुद्दा उपस्थित करणार नाही तसेच सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेईन असंही भाई जगताप यांनी म्हटलं आहे.

दरम्यान १८ सीलबंद करण्यात आलेले ईव्हीएम स्ट्राँगरूम ऐवजी अन्यत्र ठेवण्यात आले होते. तर मॉक पोल झालेल्या ईव्हीएमची व्हीव्हीपॅटसोबत पडताळणी आवश्यक असते. परंतु, बहुतांश कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली नसल्याची तक्रार भाई जगताप यांनी केली आहे. तसेच पडताळणीपूर्वीच ८ ते ९ मशीन सील करण्यात आल्या होत्या. याबाबत निवडणूक आयोगानं खुलासा करावा अशी मागणीही भाई जगताप यांनी केली आहे.

दरम्यान कालच काँग्रेसनं ईव्हीएम असणाऱ्या गोडाऊन परिसराजवळ जॅमर लावावेत अशी मागणी केली होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ही मागणी केली असून यासंबंधी काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं आहे. मतमोजणीच्या वेळी स्ट्रॉंगरूमच्या आसपास इंटरनेट सुविधा बंद करावी अशी मागणीही काँग्रेसने केली आहे. त्यानंतर आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कुलाबा मतदारसंघातील उमेदवार भाई जगताप यांनी ईव्हीएमबाबतची शंका दूर करण्यासाठी युतीचे उमेदवार निवडून आलेल्या ठिकाणांपैकी २५ जागांवर बॅलेट पेपरच्या सहाय्यानं निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग यकाय भूमिका घेणार हे पाहणं गरजेचं आहे.

COMMENTS