काँग्रेसचे ‘ते’ चार आमदार राजीनामा देणार ?

काँग्रेसचे ‘ते’ चार आमदार राजीनामा देणार ?

बंगळूरु  – काँग्रेसचे चार आमदार राजीनामा देणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कर्नाटकातील माजी मंत्री रमेश जारकीहोळी, महेश कुमठळ्ळी, डॉ. उमेश जाधव व बी. नागेंद्र हे राजीनामा देणार असल्याची माहिती आहे. व्हीप जारी करूनही सातत्याने विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला व विधिमंडळाच्या अधिवेशनाला अनुपस्थित राहिल्यामुळे या चारही आमदारांना अपात्र ठरविण्याची मागणी विधिमंडळ पक्षाचे नेते सिद्धरामय्या यांनी केली आहे. पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत या चारही आमदारांवर कारवाई करण्याचा निर्णय काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला होता. परंतु अपात्रतेची कारवाई करण्यापूर्वीच हे आमदार राजीनामा देणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान या चारही आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर तो केव्हा स्वीकारावयाचा हा सभापतींचा अधिकार आहे. राजीनामे स्वीकारण्यास ते दिरंगाई करू शकतात. राजीनामा दिल्यानंतर तो किती दिवसांत स्वीकारायचा, याबाबत नियम नाही. राजीनामा स्वीकारण्याची विनंती करण्यासाठी सभापतींविरुद्ध न्यायालयात किंवा राज्यापलीकडेही जाता येत नाही. त्यामुळे चारही आमदार अडचणीत आले असून विधानसभा सभापती रमेशकुमार हे सिद्धरामय्या यांच्या तक्रारीवर आता काय कारवाई करणार याकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS