परळीत काँग्रेसला खिंडार, ‘या’ नेत्याचा भाजपात प्रवेश !

परळीत काँग्रेसला खिंडार, ‘या’ नेत्याचा भाजपात प्रवेश !

परळी – जिल्हा काँग्रेस समितीचे माजी सरचिटणीस तथा वैद्यनाथ देवस्थान समितीचे सचिव राजेश देशमुख यांनी आज राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. पंकजा मुंडे यांनी प्रवेश होताच त्यांची भाजपच्या प्रदेश चिटणीस पदी नियुक्ती करून त्यांचा सन्मान वाढवला. दरम्यान, या निवडणुकीत संपूर्ण जिल्हयात दौरे करून खा. डाॅ. प्रितम मुंडे यांना विजयी करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावणार असल्याचा निर्धार देशमुख यांनी केला आहे.

गेल्या कांही दिवसांपासून देशमुख काॅग्रेसच्या कार्यपध्दतीवर नाराज होते. मध्यंतरी परळी नगरपरिषदेच्या अध्यक्ष पदाची निवडणूक त्यांनी चांगली मते घेवून अपक्ष म्हणून लढवली होती. वैद्यनाथ मंदिर देवस्थान समितीचे सचिव असलेल्या देशमुख यांनी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस, नगरसेवक आदी विविध पदं भूषविलेली आहेत. एक चांगला वक्ता व सर्व सामान्य जनतेशी त्यांचा दांडगा संपर्क आहे. पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची त्यांची इच्छा होती, त्यानुसार आज त्यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यासह भाजपात प्रवेश केला. प्रवेश होताच पंकजा मुंडे यांनी त्यांची लगेचच भाजपच्या प्रदेश कार्यसमितीवर चिटणीस म्हणून नियुक्ती केली व त्यांचा सन्मान वाढवला.

मुंडे भगिनींचे हात बळकट करणार

पंकजा मुंडे व खा डाॅ प्रितम मुंडे यांनाच सर्व सामान्य माणसाच्या प्रश्नांशी खरी जाण आहे, जिल्हयाच्या विकासासाठी त्यांची प्रामाणिक तळमळ पाहता त्यांचे हात बळकट करण्यासाठी आपण त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीत खा. डाॅ. प्रितम मुंडे यांना मताधिक्य मिळवून देण्यासाठी जीवाचे रान करणार आहोत असे राजेश देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. या प्रवेशाच्या वेळी भाजपचे शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, विजयकुमार मेनकुदळे, दत्ताप्पा इटके, विकासराव डूबे, प्रदीप देशमुख, नगरसेवक पवन मुंडे, अल्पसंख्याक आघाडीचे वहाजुद्दीन मुल्ला यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

COMMENTS