काँग्रेसला धक्का, ‘या’ नेत्याचा शिवसेनेत प्रवेश!

काँग्रेसला धक्का, ‘या’ नेत्याचा शिवसेनेत प्रवेश!

मुंबई – लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसला धक्का बसला असून काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या आणि मीडिया सेलच्या समन्वयक प्रियांका चतुर्वेदी यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. आज दुपारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रियांका यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी आदित्य ठाकरे आणि सुभाष देसाई उपस्थित होते. आता राष्ट्रीय पातळीवर शिवसेनेचा प्रचार करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी चतुर्वेदींशी गैरवर्तणूक केली, परंतु या गंभीर प्रकरणाची पक्षानं दखल घेतली नसल्याचा आरोप प्रियांकांनी केला आहे.

तसेच लोकसभा निवडणुकीत मला तिकीट मिळेल अशी आशा होती, पण तिकीट न दिल्याने मी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली असे म्हणणे योग्य ठरणार नाही. मी विचार केल्यानंतरच शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी ट्विटरच्या माध्यमातून चतुर्वेदींनी काँग्रेसचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले.

जड अंत:करणानं हा निर्णय आपण घेतला असल्याचं त्यांनी म्हटले आहे. दहा वर्षांपूर्वी मुंबईमध्ये युवक काँग्रेसमध्ये मी प्रवेश केला होता. सर्वसमावेशक, मुक्त व पुरोगामी अशा काँग्रेसच्या आदर्शांवर माझा विश्वास होता, परंतु आता तो विश्वास उडाला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

COMMENTS