काॅंग्रेसची राष्ट्रपती भवनावर धडक

काॅंग्रेसची राष्ट्रपती भवनावर धडक

नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात गेल्या २८ दिवसांपासून आंदोलनावर बसलेल्या शेतकऱ्यांच्या मुद्यांवर गुरुवारी काँग्रेसच्यावतीने राष्ट्रपती भवनावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात माजी अध्यक्ष राहुल गांधी, महासचिव प्रियांका गांधींसहीत काँग्रेसचे अनेक नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. या दरम्यान पोलिसांनी हा मोर्चा रोखला तसेच प्रियांका गांधीसहीत अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

राष्ट्रपतींच्या वतीने तीन जणांना भेटण्यासाठी परवानगी दिली होती. दिल्लीत सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनात काॅंग्रेसने आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी मोर्चा रोखला. ज्यांना राष्ट्रपतींना भेटण्याची परवानगी मिळाली आहे केवळ तेच राष्ट्रपतींना भेटण्यासाठी रवाना होतील, असं पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना रोखताना म्हटलं. पोलिसांकडून रोखलं गेल्यानंतर प्रियांका गांधी रस्त्यावरच ठाण मांडून बसल्या. ‘सरकारविरोधी निघणाऱ्या कोणतंही पाऊल दहशतवादी ठरवलं जातं. आम्ही हा मोर्चा शेतकऱ्यांच्या समर्थनासाठी काढत आहोत’ असं यावेळी प्रियांका गांधी यांनी म्हटले.

प्रियांका गांधी आणि काँग्रेसच्या इतर नेत्या-कार्यकर्त्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेऊन मंदिर मार्ग पोलीस स्टेशनमध्ये नेले. दरम्यान, राहुल गांधी, विरोधी पक्षनेते अधिरंजन चौधरी, गुलाब नबी आझाद यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

 

COMMENTS