काँग्रेसला मोठा धक्का, 12 आमदारांचा ‘या’ पक्षात जाण्याचा निर्णय !

काँग्रेसला मोठा धक्का, 12 आमदारांचा ‘या’ पक्षात जाण्याचा निर्णय !

हैदराबाद – तेलंगाणामध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला असून काँग्रेसच्या १२ आमदारांनी सत्ताधारी तेरास (तेलंगणा राष्ट्र समिती) मध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. या 12 आमदारांनी आज विधानसभेचे सभापती पी. श्रीनिवास रेड्डी यांची भेट घेऊन काँग्रेस विधायक दल तेलंगाणा राष्ट्र समितीमध्ये विलीन करण्याबाबत निवेदन दिले आहे.गेली काही दिवसांपासून काँग्रेसचे आमदार तेरासमध्ये जाण्याच्या तयारीत होते. काँग्रेस आमदार रोहित रेड्डी यांनी टीआरएस कार्यकारी समितीचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे पुत्र के. टी. रामा पाव यांची भेट घेतली होती.

दरम्यान तेलंगाणा प्रदेश काँग्रेसचे प्रमुख उत्तम कुमार यांचा लोकसभा निवडणुकीत विजय झाला. त्यानंतर त्यांनी आज आमदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे ११९ सदस्य असलेल्या तेलंगाणा विधानसभेत काँग्रेसचे संख्याबळ १८ च्या खाली गेले आहे.

त्यानंतर आज 12 आमदारांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे वरिष्ठ आमदार गंद्र व्यकंटा रामना रेड्डी म्हणाले की, राज्याच्या विकासासाठी आम्ही १२ आमदारांनी मुख्यमंत्र्यांसोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही सभापतींची भेट घेऊन काँग्रेस विधायक दल टीआरएसमध्ये विलीन करण्याबाबत विनंती केली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर तेलंगणात काँग्रेसला हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.

COMMENTS