लोकसभेच्या ‘या’ जागेवरुन आघाडीत अजूनही तिढा, काँग्रेस-राष्ट्रवादीत रस्सीखेच !

लोकसभेच्या ‘या’ जागेवरुन आघाडीत अजूनही तिढा, काँग्रेस-राष्ट्रवादीत रस्सीखेच !

मुंबई  आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील जागावाटपाचा तिढा सुटला असल्याचं बोललं जात आहे. परंतु अजूनही काही जागांसाठी स्थानिक नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरु असल्याचं दिसत आहे. औरंगाबाद लोकसभेच्या जागेचा तिढा अजून सुटला नसल्याचं दिसत आहे.परंतु हा तिढा सुटला नसला तरी काँग्रेसने औरंगाबादच्या जागेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. विशेष म्हणजे या जागेसाठी राष्ट्रवादी इच्छुक आहे. राष्ट्रवादीला ही जागा देण्याची चर्चा देखील होती. परंतु अशातच काँग्रेसनं उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यामुळे या जागेवरुन दोन्ही पक्षात रस्सीखेच सुरु असल्याचं दिसत आहे.

दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा काँग्रेसची ताकद अधिक असल्याचं सांगत लोकसभेसाठी इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरु केलीय. औरंगाबाद शहरातील काँग्रेस भवनमध्ये इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. या उमेदवारांची नावेही प्रदेश पातळीवर पाठवल्यानंतर तिथून उमेदवारांची निश्चिती केली जाणार आहे. काँग्रेसनेही नव्या समीकरणातून नव्या चेहऱ्याचा शोध घ्यायला सुरुवात केलीय. आमदार सुभाष झाबड, माजी आमदार कल्याण काळे, नामदेव पवार, डॉ. रवींद्र बनसोड यांची नावे आघाडीवर असल्याची माहिती आहे.

औरंगाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. खासदार चंद्रकांत खैरे हे गेल्या चार टर्मपासून या मतदारसंघात निवडून येत आहेत. परंतु मागच्या निवडणुकीत मोदी लाट असताना त्यांच्या मताधिक्क्यात घट झाली. शिवाय, यंदा केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणावर मतदार नाराज आहेत. त्यामुळे याचा फायदा आपल्याला होऊ शकतो असा विश्वास काँग्रेसला आहे.परंतु या जागेसाठी राष्ट्रवादी आग्रही आहे. अशातच काँग्रेसने उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. त्यामुळे या जागेचा तिढा आता पक्षश्रेष्ठींकडून कसा सोडवला जाणार हे पाहणं गरजेचं आहे.

COMMENTS